सोशल मीडियाच्या जगात कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या बांगलादेशातील एका पांढऱ्याशुभ्र अल्बिनो (Albino Buffalo) जातीच्या म्हशीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. या म्हशीच्या मालकाने तिचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प’ असे ठेवले आहे. ही ‘डोनाल्ड ट्रम्प’ म्हैस पाहण्यासाठी बांगलादेशात लोकांची तुफान गर्दी उसळली आहे. आगामी ईद-उल-अजहा (बकरीद) सणादरम्यान या म्हशीची कुर्बानी दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सोनेरी केस आणि गुलाबी त्वचा!
बांगलादेशची राजधानी ढाका जवळील नारायणगंज येथील एका फार्ममध्ये हा ७०० किलो वजनाची म्हैस वाढवण्यात आली आहे. या चार वर्षांच्या अल्बिनो म्हशीच्या कपाळावर सोनेरी रंगाचे लांब केस आहेत, जे हुबेहूब डोनाल्ड ट्रम्प यांच्या केशरचनेसारखे दिसतात, असे नेटकर्यांचे म्हणने आहे. तसेच तिची त्वचा सामान्य म्हशींसारखी काळी नसून फिकट गुलाबी रंगाची आहे. यामुळेच स्थानिक लोकांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी त्याला ‘डोनाल्ड ट्रम्प’ हे नाव दिले.
सेल्फीसाठी उडाली झुंबड, मालक भावूक
या अनोख्या प्राण्याला पाहण्यासाठी दूरदूरच्या जिल्ह्यांमधून लोक नारायणगंज येथे येत आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाला या ‘डोनाल्ड ट्रम्प’सोबत सेल्फी आणि व्हिडिओ काढायचा आहे. फार्मचे मालक झियाउद्दीन मृधा यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, “माझ्या लहान भावाने याचे केस पाहून याचे नाव ‘डोनाल्ड ट्रम्प’ ठेवले होते. हा प्राणी स्वभावाने अत्यंत शांत आहे. आगामी ईदसाठी एका ग्राहकाने हा खरेदी केला असून त्याची कुर्बानी दिली जाईल. मला त्याची खूप आठवण येईल, पण त्याग हाच या सणाचा मुख्य संदेश आहे.”
व्हीआयपी ट्रीटमेंट आणि वाढता ताण
या दुर्मिळ म्हशीची काळजी घेण्यासाठी मालकाला विशेष मेहनत घ्यावी लागत होती. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्याला दिवसातून चार वेळा आंघोळ घालावी लागत असे, तसेच त्याचा आहारही खास होता. मात्र, गेल्या काही दिवसांत वाढलेली गर्दी आणि सततच्या कॅमेऱ्यांच्या फ्लॅशमुळे हा प्राणी प्रचंड तणावाखाली आला होता. गर्दीमुळे त्याचे वजनही घटले असून, अखेर मालकाने लोकांना पाहण्यासाठी काही निर्बंध घातले होते. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या मते, शरीरात ‘मेलेनिन’ या घटकाची कमतरता असल्यामुळे अशा अल्बिनो म्हशींचा रंग पांढरा किंवा गुलाबी आणि केस सोनेरी होतात. बांगलादेशात असे प्राणी अत्यंत दुर्मिळ आढळतात.
इराणने उडवली ट्रम्प यांची खिल्ली!
दरम्यान, या व्हायरल व्हिडिओचा आधार घेत इराणने अमेरिकेवर राजकीय निशाणा साधला आहे. अमेरिका आणि इराणमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, रशियातील इराणच्या अधिकृत सोशल मीडिया (X) खात्यावरून या म्हशीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला.
व्हिडिओ शेअर करत इराणचा उपरोधिक टोला
“बिचारा प्राणी! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी तुलना केल्यामुळे बांगलादेशातील या म्हशीने म्हणे जेवणच सोडले आहे आणि ती प्रचंड नाराज आहे.” इराणच्या या उपरोधिक पोस्टची सध्या जागतिक पातळीवर चांगलीच चर्चा रंगली आहे. बांगलादेशात बकरीद सणाच्या काळात असे मोठे आणि अतरंगी नावे असलेले प्राणी दरवर्षी डिजिटल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात.
