दिल्लीत मद्य होणार स्वस्त; ‘करोना शुल्क’ हटवण्याचा केजरीवाल सरकारचा निर्णय

लॉकडाउनमुळं सरकारी तिजोरीवर आलेला ताण कमी करण्यासाठी लावले होते ‘करोना शुल्क’

संग्रहित छायाचित्र

करोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं महसूल बुडाल्याने सरकारी तिजोरीवर आलेला ताण कमी करण्यासाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने सर्व प्रकारच्या मद्यावर ७० टक्के ‘करोना शुल्क’ लागू केले होते. त्यामुळे मद्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली होती. यामुळे मद्यप्रेमींच्या खिशाला चांगला भुर्दंड पडत होता. मात्र, आता इथल्या मद्यप्रेमींसाठी दिलासादायक बातमी असून केजरीवाल सरकारने हे ‘करोना शुल्क’ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता छापील किरकोळ विक्री किंमतीत मद्य मिळू शकणार आहे.

लॉकडाउनच्या काळात केजरीवाल सरकारने ५ मे पासून मद्याची दुकानं खुली करण्यात परवानगी दिली होती. त्यावेळी या दुकानांवर मद्यप्रेमींची मोठ्या प्रमाणावर गर्दी पहायला मिळत होती. ती गर्दी टाळण्यासाठी तसेच सरकारच्या महसूलात वाढ व्हावी यासाठी ७० टक्के ‘करोना शुल्क’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आता येत्या १० जूनपासून हे शुल्क रद्द करण्यात येणार आहे. मात्र, सरकारने दुसरीकडे सर्व प्रकारच्या मद्यावरील व्हॅट वाढवून तो २० टक्क्यांवरुन २५ टक्के केला आहे.

पीटीआयच्या हवाल्याने टाइम्स नाउने यासंदर्भात वृत्त दिले आहे. यामध्ये म्हटले की, दिल्लीत ७० टक्के इतक्या मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारच्या मद्यावर ‘करोना शुल्क’ लागू करण्यात आल्याने मद्याच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणार घट पहायला मिळाली आहे. याबाबत सरकारला कोर्टात उत्तर द्यावे लागले होते.

दरम्यान, CIABC चे महासंचालक विनोद गिरी यांनी दिल्ली सरकारला पत्राद्वारे सांगितले की, “सध्याच्या उपलब्ध डेटानुसार, आम्ही व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे. सुरुवातीला झालेल्या मद्यविक्रीनंतर मे महिन्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Alcohol will be cheaper in delhi kejriwal governments decision to remove corona fees aau