इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते असलेले अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे भारतातही पडसाद उमटले. काश्मीरपासून कर्नाटकपर्यंत विविध शहरांमध्ये मुख्यतः शियापंथीय मुस्लिमांनी रस्त्यावर उतरून खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोक आणि संताप व्यक्त केला.अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू, श्रीनगर, बारामुल्ला, बडगाम, बांदीपुरा, अनंतनाग आणि पुलवामा येथे मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आले.
यावेळी अमेरिकाविरोधी आणि इस्रायलविरोधी घोषणा देण्यात आल्या.जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इराणमधील घडामोडींबद्दल चिंता व्यक्त केली आणि निदर्शकांना शांततेचे आवाहन केले. सध्या इराणमध्ये असलेले जम्मू-काश्मीरचे विद्यार्थी, रहिवासी यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी आपले सरकार परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वयाने काम करत आहे, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती, काश्मीरचे मुख्य धर्मगुरू मिरवैज उमर फारुख यांनीही खामेनी यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला.
उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे बडा इमामबाडा मशिदीजवळ मोठ्या प्रमाणात शिया नागरिकांनी एकत्र जमून शोक व्यक्त केला, तसेच घोषणाबाजी केली. यावेळी अनेक महिलांनी खामेनी यांचे छायाचित्र जवळ बाळगले होते. उत्तर प्रदेशात शिया पंथीयांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून देशभरातील अनेक मुस्लीम संस्था आणि संघटनांनी वेगवेगळ्या दिवसांचा शोक कालावधी जाहीर केला आहे.
पंजाबच्या लुधियानामध्ये खामेनींच्या मृत्यूचा निषेध करण्यात आला आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांचे पुतळे जाळण्यात आले. अजमेर, हैदराबाद, कर्नाटकातील चिक्कबल्लापूर या ठिकाणीही शोक व्यक्त करण्यात आला.
