अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (वय ८६) यांचा रविवारी सकाळी मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच इराणच्या संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अब्दुलरहिम मौसावी, संरक्षणमंत्री अझीझ नसीर झादेह, इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे प्रमुख आणि सुरक्षा सल्लागार अली शामखानी हेदेखील हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती इराणच्या सरकारी दूरचित्रवाहिन्यांनी दिली. खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराणमध्ये नेतृत्वाची पोकळी तयार झाली असून, प्रादेशिक अस्थिरता निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
खामेनी यांच्या मृत्यूनंतर अयातुल्ला अली रझा अराफी यांची इराणच्या नेतृत्व मंडळात न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खामेनी यांच्यानंतर नवे नेतृत्व नियुक्त होईपर्यंत ते हंगामी कारभार सांभाळतील. ‘आयएसएनए’ या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. इराणच्या नव्या नेतृत्वाने चर्चा करण्याची तयारी दर्शवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ही चर्चा तातडीने व्हायला हवी अशी अपेक्षा ट्रम्प यांनी अटलांटिक नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली. मात्र ही चर्चा कुणाशी आणि केव्हा होणार हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही.
ट्रम्प यांनीही खामेनी यांच्या मृत्यूची घोषणा करताना इराणच्या जनतेने त्यांच्या देशाची सूत्रे हाती घ्यावीत, असे आवाहन केले. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणच्या लष्करी आणि सरकारी आस्थापनांवर मोठे हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये इराणचे ४८ नेते ठार झाल्याचे ट्रम्प यांनी नमूद केले. आवश्यकतेनुसार, पुढील आठवडाभर इराणवर जोरदार बॉम्बहल्ले होत राहतील, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. दरम्यान, इराणने या हल्ल्यांमध्ये दोनशेहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
हा खूनच – पुतिन
अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यावेळी खामेनी हे त्यांच्या कार्यालयात काम करीत होते. हल्ल्यामध्ये त्यांच्यासह त्यांची मुलगी, नातू, सून आणि जावयाचाही मृत्यू झाला. खामेनी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा झालेला मृत्यू हा निर्घृण खून असल्याची प्रतिक्रिया रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी व्यक्त केली आहे. मानवी नैतिकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचे हे संपूर्णपणे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गुप्तहेरांची अचूक माहिती
जेरुसलेमः इस्रायलच्या हवाई दलाने केलेल्या अचूक, मोठ्या प्रमाणावरील हल्ल्यात अली खामेनी यांना लक्ष्य करण्यात आले. गुप्तहेरांनी दिलेल्या अचूक माहितीच्या आधारावर मोहीम राबविण्यात आली असे इस्रायलच्या संरक्षण दलाने स्पष्ट केले. ‘आयडीएफ’ने म्हटले आहे, इराणचे सर्वोच्च प्रमुख खामेनी १९८९ पासून सत्तेवर होते. इराणच्या नागरिकांचा गेली अनेक वर्षे ते छळ करीत होते. इस्रायलच्या विनाशाचे नियोजन खामेनी यांनी केले. संपूर्ण पश्चिम आशियात आणि इस्रायलच्या सीमेजवळ शस्त्रास्त्रे त्यांनी आणून ठेवली. यातील महत्त्वाचे नाव म्हणजे लेबनॉनमधील हेजबोला दहशतवाद्यांचे जाळे. इस्रायलविरोधात दहशतवादी हल्ले आणि जगभरात अनेक नागरिकांच्या मृत्यूसाठी खामेनी जबाबदार होते. त्यांच्या मृत्यूने एक मोठा अध्याय संपला आहे असे नमूद केले.
