Ali Larijani On US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या जवळपास १५ दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती आहे. या युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणाव आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. याचा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. तरीही युद्ध अद्याप थांबलेलं नाही.

असं असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे रोज वेगवेगळे वक्तव्य करत इराणला धमकी देत आहेत, तर इराणचे मंत्री आणि अधिकारीही अमेरिकेला इशारा देत आहेत. त्यामुळे या युद्धाची परिस्थिती दररोज आणखी गंभीर होत चालली आहे. यातच आता इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी एक मोठा दावा केला आहे.

‘एपस्टाईन नेटवर्क ९/११ सारख्या हल्ल्याचा कट रचून तेहरानला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे’, असा गंभीर आरोप इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

अली लारीजानी यांनी काय म्हटलं?

“मी असं ऐकलं आहे की एपस्टाईनच्या नेटवर्कमधील उर्वरित सदस्य ९/११ सारखा हल्ला करण्याचा कट रचत आहेत आणि त्या हल्ल्याचा दोष इराणवर टाकण्याची योजना आखत आहेत. मात्र, इराण अशा दहशतवादी कारस्थानांचा कडाडून विरोध करतो आणि अमेरिकन लोकांशी युद्ध करत नाही”, असं अली लारीजानी यांनी म्हटलं म्हटलं आहे.

चीनकडे मदत मागितल्यामुळे इराणने उडवली ट्रम्प यांची खिल्ली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी ‘होर्मुझच्या सामुध्रुनी’तून (Strait of Hormuz) होणारी व्यापारी जहाजांची वाहतूक सुरक्षित करण्यासाठी इतर राष्ट्रांना मदतीचे आवाहन केले. मात्र, इराणने या विनंतीची खिल्ली उडवली आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत म्हटले की, अमेरिकेचे सुरक्षा कवच “छिद्रांनी भरलेले” (कुचकामी) आहे. त्यांनी असा दावाही केला की, होर्मुझ सुरक्षित ठेवण्यासाठी अमेरिका आता चीनसारख्या देशांकडे “याचना” करत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, जगातील सर्वात महत्त्वाच्या ऊर्जा मार्गांपैकी एक असलेला हा भाग आता वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

“अमेरिकेचे तथाकथित सुरक्षा कवच कुचकामी ठरले असून ते संकटांना रोखण्याऐवजी निमंत्रण देत आहे. अमेरिका आता होर्मुझ सुरक्षित करण्यासाठी इतरांकडे, अगदी चीनकडेही मदत मागत आहे. इराण आपल्या शेजारी राष्ट्रांना आवाहन करतो की, त्यांनी विदेशी आक्रमकांना हाकलून लावावे, कारण त्यांचा एकमेव हेतू इस्रायलचे रक्षण करणे हाच आहे,” असे अराघची यांनी नमूद केले.