उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील एका पोलीस ठाण्यात पोलिसाच्या बंदुकीतून चुकून सुटलेली गोळी लागून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची परिस्थिती नाजूक आहे. याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार ही महिला अलीगड कोतवाली नगर पोलीस ठाण्यात पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी आली होती. पोलिसाच्या टेबलसमोर ती उभी असतानाच पोलीस ठाण्यात तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक मनोज शर्मा यांच्या सरकारी बंदुकीतून गोळी झाडली गेली. बंदुकीतून सुटलेली ही गोळी महिलेच्या डोक्याजवळ कानाच्या वर लागली.
दरम्यान, बेजबाबदार पोलीस उपनिरीक्षक मनोज शर्मा सध्या फरार आहेत. वरीष्ठ पोलीस अधीक्षकांनी मनोज शर्मा यांना निलंबित केलं आहे. तसेच शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना शोधण्याचे आदेश दिले आहेत.
या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी २.३० वाजता घडल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या महिलेचं नाव इशरत जहाँ असं असून ती पोलीस ठाण्यात पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी आली होती. इशरत जहाँ या त्यांचा मुलगा इशानबरोबर पोलीस ठाण्यात गेल्या होत्या.
सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये दिसतंय की इशरत जहाँ आणि त्यांचा मुलगा इशान एका टेबलजवळ उभे रहून पोलिसाची वाट पाहत होते. त्याचवेळी मनोज शर्मा तिथे आले. तसेच त्यांचा सहकारी पोलीस त्यांचं पिस्तूल घेऊन तिथे आला. सहकाऱ्याने शर्मा यांच्याकडे पिस्तूल सोपवलं. शर्मा यांनी ती बंदूक लोड केली. केवळ बंदूक लोड करून ते थांबले नाहीत तर त्यांनी कुठलाही विचार न करता ट्रिगरही दाबला. त्यानंतर बंदुकीतून सुटलेली गोळी इशरत जहाँ यांच्या डोक्यात घुसली.
स्थानिकांचा पोलिसांविरोधात आक्रोश
इशरत जहाँ यांना गोळी लागल्यानंतर मनोज शर्मा यांनी बंदूक टेबलवर ठेवली आणि इशरत जहाँ यांच्याजवळ गेले. तोवर त्या जमिनीवर कोसळल्या होत्या. गोळीचा आवाज ऐकून पोलीस ठाण्यात गर्दी जमली. गर्दीचा फायदा घेत मनोज शर्मा तिथून फरार झाले. मनोज शर्मा यांना अटक करावी यासाठी पोलीस ठाण्यात लोकांनी गोंधळ घातला. तसेच पोलिसांविरोधात घोषणा दिल्या. पोलीस ठाण्यातला लोकांचा गोंधळ पाहून अतिरिक्त पोलीस कुमक बोलवावी लागली. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या इशरत जहाँ यांना जे. एन. वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे.
पोलिसांनी पैसे मागितल्याचा आरोप
दरम्यान, इशरत जहाँ यांच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की, पासपोर्ट व्हेरिफिकेशन विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्याने पैसे मागितले होते. पैशांवरून इशरत यांचे कुटुंबीय आणि अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीदेखील झाली होती. त्यामुळेच अधिकाऱ्याने इशरत जहाँ यांच्यावर गोळी झाडली. इशरत जहाँ यांचे नातेवाईक झिशान एनडीटीव्हीला म्हणाले, इशरत जहाँ पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. त्यांना सातत्याने पैशांसाठी फोन येत होते. त्यांना गोळी का मारली किंवा पैशांच्या मागणीबाबत मला फार काही माहिती नाही.
हे ही वाचा >> पाच वर्षांत ४०३ भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात मृत्यू; ‘या’ देशात सर्वाधिक विद्यार्थी मृत्यूमुखी
दरम्यान, याप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक कलानिधी नैथानी म्हणाले, आरोपी मनोज शर्मा फरार आहेत. एक पोलीस पथक त्यांच्या मागावर पाठवलं आहे. इशरत जहाँ यांच्या कुटुंबीयांच्या फिर्यादीनुसार शर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.