उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये २० वर्षीय विद्यार्थिनीची तिच्या कुटुंबीयांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही मुलगी कायद्याचं शिक्षण घेत होती. एका तरुणाशी मैत्री तोडण्यास नकार दिल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी सांगितला. या प्रकरणात पोलिसांनी विद्यार्थिनीच्या वडिलांसह तिघांना अटक केली असून एका अल्पवयीन नातेवाईकाविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, तिची हत्या कशी करण्यात आली हे तक्रारीत नमूद केलेले नाही.

मित्राच्या तक्रारीनंतर उघडकीस आले प्रकरण

अलीगडचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक नीरज कुमार जादौन यांनी सांगितले की, पीडितेचा मित्र हर्षित वार्ष्णेय याने शुक्रवारी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यात, विद्यार्थिनीची २३ जुलै रोजी तिच्या कुटुंबीयांनी हत्या केल्याचा आरोप करण्यात आला होता.

तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. अलीगडच्या गोंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२) (स्वेच्छेने दुखापत करणे), ३५१(३) (गंभीर स्वरूपाची गुन्हेगारी स्वरूपाची धमकी), १०३(१) (हत्या), २३८ (पुरावा नष्ट करणे) आणि ३(५) (सामायिक उद्देश) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

वडिलांसह तिघांना अटक

या प्रकरणात विद्यार्थिनीचे वडील अवधेश कुमार, चुलत भाऊ अनुराग आणि काका जितेंद्र यांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका अल्पवयीन नातेवाईकाविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने विद्यार्थिनीच्या मृतदेहावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आले.

शाळेपासूनची ओळख, प्रेमसंबंधांचा दावा

हर्षित वार्ष्णेय हा अलीगडमधील गोंडा परिसरात औषधाचे दुकान चालवतो. पोलिसांच्या माहितीनुसार, त्याची आणि विद्यार्थिनीची शाळेपासून ओळख होती आणि दोघे प्रेमसंबंधात असल्याचा त्याचा दावा आहे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, १५ मार्च रोजी विद्यार्थिनी हर्षितच्या दुकानात गेली असता तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना गोंडा पोलिस ठाण्यात बोलावले होते. त्यावेळी विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी लेखी हमी देऊन तिला आपल्या ताब्यात घेतले होते.