वृत्तसंस्था, लखनौ : अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या सहायक प्राध्यापकास बुधवारी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले. त्याने फोरेन्सिक औषध विभागाच्या वर्गात हिंदू पुराणकथांतील दाखले देत देवतांचा आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा आरोप आहे. प्राथमिक अहवालानुसार डॉ. जितेंद्र कुमार यांनी गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्याचे सांगून त्यांना त्याबद्दल लेखी खुलासा मागण्यात आला आहे. तोपर्यंत आम्ही त्यांना निलंबित केल्याचे विद्यापीठाचे जनसंपर्क प्रमुख शफी किडवाई यांनी सांगितले.

किडवाई म्हणाले, की या व्याख्यानात सादर केलेल्या ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’चे ‘स्क्रीनशॉट’ विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांवरून पसरवले होते. विद्यापीठाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, संबंधित प्राध्यापकाच्या लेखी खुलाशानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येईल. अशा प्रकरणांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून उपाययोजना सुचवण्यासाठी विद्यापीठाने दोन सदस्यीय समितीही नेमली आहे.

जितेंद्र कुमार यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले, की अलिगढ विद्यापीठांतर्गत जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. जितेंद्र कुमार यांनी वर्गात ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’ देताना आक्षेपार्ह भाषा वापरली. डॉ. नीलेश शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आम्ही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  दरम्यान, जितेंद्र कुमार यांनी या प्रकरणी बिनशर्त माफी मागितली आहे.