आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर बेपत्ता झालेल्या हवाईदलाच्या अपघातग्रस्त एनएन-३२ विमानाचा संपूर्ण सांगाडा गुरूवारी सकाळी शोध पथकाला हाती लागला. यातील सर्व १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. दुपारनंतर या सर्वांचे मृतदेह हाती लागले व ब्लॅक बाॅक्स देखील सापडल्याची माहिती समोर आली.

वायुसेनेकडून याबाबत माहिती देण्यात आली असुन, वायुसेनेच्या ट्विटर वर अधिकृतरित्या याबाबत कळवण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी शोधपथक जेव्हा अपघातग्रस्त विमानाच्या ढिगा-याजवळ पोहचले तेव्हा त्या ठिकाणी त्यांना कोणाच्याही मृतदेहाचे अवशेष आढळले नव्हते त्यामुळे या विमान अपघातात सर्व १३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे वायुसेनेकडून त्यांच्या नातेवाईकांना  कळवण्यात आले होते.

अपघातात प्राण गमावलेले १३ जण –
विंग कमांडर जी एम चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस मोहंती, फ्लाइट लेफ्टनंट एम के गर्ग, वॉरंट ऑफिसर केके मिश्रा, सार्जेंट अनूप कुमार, कोरपोरल शेरीन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस के सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, कर्मचारी पुताली आणि राजेश कुमार यांचा अपघातामधील मृतांध्ये समावेश असल्याचे भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आले आहे.

शोध  पथकात वायुसेना, लष्कराच्या जवानांसह गिर्यारोहकांचा देखील समावेश होता. ३ जुन रोजी वायुसेनेच्या एएन-३२ विमानाने जोरहाट येथुन उड्डाण केल्यानंतर अवघ्या ३५ मिनीटानंतर विमानाचा संपर्क तुटला होता. या विमानात एकुण १३ जण होते, ज्यामध्ये ८ क्रू मेंबरचा समावेश होता. हे विमान अरूणाचल प्रदेशातील मेचुका येथे जाणार होते. मेचुका हे ठिकाण भारत-चीन सीमेवरील अरूणाचल प्रदेशाताली सियांग जिल्ह्याचा एक छोटा भाग आहे. या अगोदर मंगळवारी एएन-३२ चे काही अवशेष सियांग जिल्ह्यात आढळून आले होते. दुर्घटना घडलेले ठिकाण अत्यंत उंचावर व घनदाट जगंलात असल्याने विमानाच्या संपूर्ण ढिगा-या जवळ पोहचणे आव्हानात्मक होते.