Air Ambulance Crash Jharkhand: झारखंडमध्ये एअर अ‍ॅम्ब्युलन्सच्या झालेल्या भीषण अपघातात विमानातील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती चतरा जिल्ह्याच्या पोलिस उपायुक्तांनी पीटीआयला दिली आहे. सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील सिमरियाजवळ रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सचा अपघात झाला. रांची येथून उड्डाण घेतल्यानंतर काहीकाळ हे चार्टर विमान रडारवरुन गायब झाले होते. दरम्यान, काही वेळानंतर त्याचा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले.

बेपत्ता झाल्यानंतर लगेच अपघात

रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या एअर अ‍ॅम्ब्युलन्सने सोमवारी संध्याकाळी ७.११ वाजता रांची विमानतळावरून उड्डाण केले. उड्डाण केल्यानंतर हे विमान रडारवर दिसत नसल्याचे वृत्त समोर आले होते. दरम्यान, काही वेळानंतर या विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. सुरुवातीला एक व्यक्ती दगावला असल्याचे सांगितले जात होते. दरम्यान, आता सर्व सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

उपायुक्तांनी काय माहिती दिली?

चतरा जिल्ह्याच्या उपायुक्त कीर्तीश्री यांनी पीटीआयला अपघाताबाबत माहिती दिली. “एअर अ‍ॅम्ब्युलन्समधील सर्व सात जणांचा मृत्यू झाला आहे. रांचीहून दिल्लीला जात असताना विमान संध्याकाळी ७.३० च्या सुमारास बेपत्ता झाले होते. सिमरियाच्या बरियातु पंचायत परिसरात ते कोसळले,” अशी माहिती कीर्तीश्री यांनी दिली.

मृतांची ओळख पटली

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली असून, पायलट-इन-कमांड कॅप्टन विवेक विकास भगत आणि सह-पायलट कॅप्टन सवराजदीप सिंग, रुग्ण संजय कुमार (४१), अर्चना देवी आणि धुरु कुमार (परिचारिका), डॉ. विकास कुमार गुप्ता आणि सचिन कुमार मिश्रा यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

रुग्णाला दिल्लीला घेऊन जाताना अपघात

संजय कुमार (४१) या रुग्णाला घेऊन एअर अ‍ॅम्ब्युलन्स रांची येथून दिल्लीला जात होती. संजय कुमार आगीत ६५ टक्के भाजले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान, चांगले उपचार मिळावेत यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी एअर अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे संजय यांना दिल्लीला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास रुग्णाला घेऊन त्यांनी दिल्लीला जाण्यासाठी प्रस्थान केले अशी माहिती समोर आली आहे.

उड्डाण केल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला

रांची विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काहीवेळातच विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण केंद्राशी संपर्क तुटला. दरम्यान, यानंतर विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. खराब हवामानामुळे विमानाचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. चौकशीअंती याबाबत अधिक माहिती समोर येईल, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.