मुस्लिमांनी ‘भारतमाता की जय’ म्हणू नये असा ‘फतवा’ दारुल उलूम देवबंदने काढल्याच्या पाश्र्वभूमीवर, मातृभूमीसाठी ही घोषणा देण्याचा प्रत्येकाला अधिकार असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी शनिवारी सांगितले.
‘भारतमाता की जय’ ची घोषणा देणे हा भावनेचा भाग आहे. आपली माता किंवा मातृभूमी यांच्यासाठी ती देणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे द्वारकेला जाण्यापूर्वी इराणी यांनी विमानतळावर पत्रकारांना सांगितले. मातृभूमीचे स्थान मातेपेक्षा कमी नाही, यावर त्यांनी भर दिला.
प्रत्येक भारतीयाने ‘भारतमाता की जय’ म्हणावे असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केल्यानंतर एमआयएमचे नेते व खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्याला विरोध दर्शवल्यावर या विषयावरील वाद सुरू झाला. त्यातच, ही घोषणा इस्लामच्या शिकवणीविरुद्ध असल्यामुळे मुस्लिमांनी ती देऊ नये, असे दारुल उलूमने शुक्रवारी म्हटले होते. प्रदेशाध्यक्ष विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात गुजरातमध्ये भाजप अधिक चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा इराणी यांनी व्यक्त केली.