गेल्या महिनाभरात मी ज्या कठीण परिस्थितीतून गेलोय… मी जे काही सोसलाय… त्यावर खरंच जमलं तर चित्रपट काढण्याची माझी इच्छा आहे, अशी भावना स्पॉट फिक्सिंगमधील आरोपी क्रिकेटपटू श्रीशांतने व्यक्त केलीये. श्रीशांत, अंकित चव्हाण यांच्यासह एकूण १९ जणांची मंगळवारी रात्री जामीनावर तिहार कारागृहातून सुटका झाली. कारागृहातून बाहेर आल्यावर श्रीशांतने पत्रकारांशी बोलताना श्रीशांतने आपल्या मनातील खदखद उघड केली.
भारतातील न्यायव्यवस्थेवर माझा संपूर्ण विश्वास आहे. मी मनापासून क्रिकेटवर प्रेम करतो. मला फक्त क्रिकेट खेळत राहायचे आहे. मला दक्षिण आफ्रिकेत जाऊन कसोटी मालिका खेळायचीये. खरंतर मला झालेल्या दुखापतीतून सावरून क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी मी खूप मेहनत घेतली होती. आता या सगळ्या घडामोडींमुळे मला पुन्हा नव्याने सुरूवात करावी लागणार आहे, असे श्रीशांत म्हणाला.
आयुष्यातील या कठीण प्रसंगी जे जे माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. ते माझे मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीय यांचे मी मनापासून आभार मानतो, असे सांगून तो म्हणाला, कारागृहात असताना माझ्या सहकारी कैद्यांकडून मी स्पॉट फिक्सिंगबद्दल ज्या काही गोष्टी ऐकला. त्या मन हेलावून टाकणाऱया होत्या. या सगळ्यातून मला सावरल्याबद्दल मी देवाचे खूप आभार मानतो.