मागील काही दिवसांपासून बनारस येथील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. सोमवारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्वेक्षण पूर्ण झालं नसल्याचं सांगितलं आहे. येत्या दोन दिवसात याबाबतचा अहवाल सादर केला जाईल, असंही संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

एकीकडे ज्ञानवापी मशिदीचा वाद सुरू असताना आता कर्नाटकातील टीपू सुलतान कालीन मशिदीवरही हिंदुत्ववादी गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. १७८२ मध्ये टीपू सुलतानने हनुमान मंदिर पाडून श्रीरंगपट्टन येथे जामा मशीद बांधली होती, असा दावा हिंदुत्ववादी गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित मशीद आमच्या ताब्यात द्यावी, तसेच मशिदीत पूजा करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कर्नाटकातील नरेंद्र मोदी विचार मंचाकडून करण्यात आली आहे.

ज्ञानवापीनंतर आता कर्नाटकच्या श्रीरंगपटन येथील जामा मशिदीचा वाद उफळला आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने आज १७ मे रोजी आपल्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक बोलावली आहे. संबंधित बैठकीत ज्ञानवापी मशीद, टिपू सुलतान मशीद यासह देशातील सध्याच्या विविध समस्यांवर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीतून पुढे कोणतं पाऊल उचलायचं याबाबत चाचपणी देखील केली जाणार आहे.

आज सायंकाळी ४ वाजता ज्ञानवापी मशीदबाबतचा निकाल सुनावला जाणार आहे. मशिदींवरून राजकीय वातावरण तापत असताना मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने तातडीची बैठक बोलावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.