संसदेच्या पावसाळी अधिवेशानापूर्वी सर्वपक्षीय बैठक; थोड्याच वेळात लोकसभा अध्यक्षांसोबत होणार चर्चा

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१९ जुलै) सुरु होणार आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

All-Party-Meet
संसदेच्या पावसाळी अधिवेशानापूर्वी सर्वपक्षीय बैठक (Photo- ANI)

संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून (१९ जुलै) सुरु होणार आहे. संसदेच्या अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची परंपरा आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती होती. सर्वपक्षीय बैठकीत ३३ पक्षांनी सहभाग घेतला होता. त्यात ४० हून अधिक नेत्यांचा सहभाग होता. सरकारकडून विरोधकांचे मुद्दे जाणून घेण्यात आले. सत्ताधारी एनडीए पक्षांचीही बैठक पार पडणार आहे. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्यासोबत चर्चा होणार आहे. तर संध्याकाळी ६ वाजता सोनिया गांधींनी काँग्रेस खासदारांची वर्च्युअल बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या जोर बैठका सुरु आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशन आक्रमक पवित्रा पाहायला मिळेल, असं दिसतंय. या अधिवेशनात तीन अध्यादेशांसह एकूण २३ विधेयकं पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या १७ नवी विधेयकं आहेत. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधीपक्षांसह सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचना मोलाच्या आहेत, असं सांगितलं.

संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ दिवस चालणार आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर संसदेचं हे पहिलं अधिवेशन आहे. त्यामुळे या अधिवेशनात विरोधकांचा आक्रमक बाणा पाहायला मिळणार आहे. विरोधक भाजपा सरकारला इंधन दरवाढ, कोविडवरील उपाययोजना आणि लस तुटवडा, परराष्ट्र धोरण, राफेल करार या सारख्या मुद्द्यांवर घेरण्याची रणनिती आखत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षांच्या रणनितीत फेरबदल केला आहे. सोनिया गांधी यांनी दोन्ही सभागृहात कामकाज करण्यासाठी दोन गट तयार केले आहेत. हा गटाच्या माध्यमातून रणनिती आखली जाणार आहे.

करोनाच्या सर्व नियमांचं पालन करत संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडणार आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी सांगितलं आहे. ज्या लोकांनी करोना लसीचे दोन डोस घेतले नाहीत. त्यांना संसद परिसरात येण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट करणं अनिवार्य आहे. राज्यसभेतील २३१ खासदारांपैकी २०० खासदारांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तर १६ खासदारांनी पहिला डोस घेतला आहे. तर लोकसभेच्या ५४० पैकी ४७० खासदारांनी कमीतकमी एक करोनाचा डोस घेतलेला आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: All party meet before parliament monsoon session rmt