करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं आतापर्यंतचा सर्वांत मोठा निर्णय घेतला आहे. आज (रविवारी) मध्यरात्रीपासून देशात एकही रेल्वे धावणार नाही. ३१ मार्चपर्यंत रेल्वेने होणारी देशातील प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय रेल्वे खात्यानं घेतला आहे. मुंबईतील लोकलसेवाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत ३१ मार्चपर्यंत एकही लोकल धावणार नाही. रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी मुंबईची लोकल सेवा रविवारी मध्यरात्रीपासून ३१ मार्चच्या मध्य रात्रीपर्यंत बंद करण्यात येत असल्याचे सांगितले. देशातील अन्यधान्य आणि इतर वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा यासाठी मालवाहतूक मात्र सुरू राहणार आहे.

देशभरात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढू लागली आहे. त्यातच महानगरांमधून गावी जाणाऱ्या लोकांनी रेल्वेमध्ये मोठी गर्दी केली आहे. शिवाय आता रेल्वे प्रवाशांमध्येही करोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेल्वे मंत्रालयानं या संदर्भात काढलेल्या पत्रकानुसार, आतापर्यंत करोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून रविवारी मंध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत देशातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद करण्यात येत आहे. सर्व प्रकारच्या मेल/एक्स्प्रेस आणि इंटरसिटी ट्रेन्स (प्रिमियम ट्रेन्ससह) आणि सर्व पॅसेंजर ट्रेन्स ह्या ३१ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

मुंबईसह देशातील सर्व उपनगरीय लोकलही बंद
रविवारी मध्यरात्रीपासून देशभरातील उपनगरीय रेल्वे सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईची लाइफलाइन असलेली मुंबई लोकल इतिहासात पहिल्यांदाच ९ दिवसांसाठी बंद राहणार आहे. याशिवाय कोलकातामधील लोकल, मेट्रो ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात येणार आहेत.

आधीच सुटलेल्या लांब पल्ल्याच्या ट्रेन्सचं काय होणार?
रविवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यत आपल्या मूळ स्थानावरून निघालेल्या मेल/एक्स्प्रेस किंवा पॅसेंजर ट्रेन आपल्या अखेरच्या स्टेशनपर्यंत धावू शकतील. पण त्यानंतर त्याही कॅन्सल करण्यात येतील.