नर्मदा संवर्धनात मध्य प्रदेशात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत त्याविरोधात जनजागृतीसाठी पंधरवडाभर आंदोलन जाहीर केलेल्या दोन ‘संतां’नी नर्मदा संवर्धन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती होताच राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्यानंतर ते आंदोलन गुंडाळले आहे. आमच्या मागण्या सरकारने मान्य केल्याने आता आंदोलनाची गरजच काय, असा उलट प्रश्न या ‘संतां’नी केला आहे.

मध्य प्रदेशात कॉम्प्प्युटर बाबा आणि महंत योगेंद्र यांनी ‘नर्मदा घोटाळा रथयात्रा’ जाहीर केली होती. एक  एप्रिल ते १५ मे या कालावधीत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्य़ात ही यात्रा जाणार होती. नर्मदेतील अवैध वाळूउपशाबाबतही या यात्रेद्वारे जनजागृती केली जाणार होती. या यात्रेचा बराच प्रचार समाजमाध्यमांवरही झाला होता. मात्र मध्य प्रदेश सरकारने मंगळवारी या दोघांसह आणखी तीन धार्मिक नेत्यांना नर्मदा संवर्धन समितीवर नेमून राज्यमंत्रिपदाचा दिल्यानंतर या दोघा धार्मिक नेत्यांनी ही यात्राच गुंडाळली आहे.

संत असूनही सरकारी पदाचे लाभ आपण का स्वीकारलेत, असे विचारता कॉम्प्प्युटर बाबा म्हणाले की, ‘‘आम्ही जर हे पद आणि सरकारी सवलती घेतल्या नसत्या, तर आम्हाला नर्मदेचे संवर्धन कसे करता आले असते? समिती सदस्य या नात्याने आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करता येणार आहे आणि नर्मदेच्या संवर्धनासाठी कोणती पावले उचचली जात आहेत, यावर लक्ष ठेवता येणार आहे. यासाठी सरकारी पदाचे पाठबळ आवश्यक होते. महंत योगेंद्र यांनीही या बोलण्यास दुजोरा देताना, सरकारने मागण्या मान्य केल्याने आता आंदोलनाची गरजच उरलेली नाही, असे सांगितले.

विशेष म्हणजे मध्य प्रदेशात याच वर्षी विधानसभा निवडणुका होत असून त्यात काही धार्मिक नेत्यांनी नर्मदेच्या प्रश्नावरून आंदोलन पुकारल्याने भाजपची कोंडी झाली होती. ती फोडण्यासाठी धार्मिक नेत्यांना राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे गाजर दाखवण्यात आले आहे, असा विरोधकांचा आरोप आहे. हा दर्जा मिळालेल्यांमध्ये या दोघांसह भय्यूजी महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज यांचाही समावेश आहे. या धार्मिक नेत्यांना समाजात जो मान आहे त्याचा लाभ उठवण्याची ही भाजपची धडपड असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. तर संतांशी संबंधित प्रत्येक गोष्टीला काँग्रेसचा विरोधच असतो, अशी टीका भाजपने केली आहे.

कोण आहेत हे पाच ‘संत’?

कॉम्प्युटर बाबा स्वामी नामदेव त्यागी हे यांचे मूळ नाव. त्यांच्याकडे नेहमीच लॅपटॉप आणि नव्या मॉडेलचा मोबाइल दिसतो. आपली बुद्धीमत्ता संगणकासारखी असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी नर्मदा घोटाळा यात्रा जाहीर करून सरकारच्या मनात धडकी निर्माण केली होती.

भय्यूजी महाराज यांचे मूळ नाव उदयसिंह देशमुख. त्यांची राहणी अगदी श्रीमंती थाटाची आहे. त्यांनी आधी मॉडेलिंगमध्येही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. जमीनदार पुत्र असलेले भय्यूजी महाराज यांचा आश्रम इंदूरमध्ये असून अलिशान मर्सिडिजमधून ते समाजसेवेसाठी फिरतात.

हरिहरानंदजी नमाई देवी सेवा यात्रा ही जगातली सर्वात मोठी नदीसंवर्धन प्रचार मोहीम आखल्याने ते प्रकाशात आले. २०१६मध्ये वर्षभर काढलेल्या या यात्रेत त्यांनी वनसंवर्धन, जैविक शेती, स्वच्छता, जमीन आणि जल संवर्धन याबाबत बऱ्याच कार्यशाळा त्यांनी घेतल्या होत्या.

योगेंद्र महंत नर्मदा घोटाळ्यावरून त्यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार भूमिका घेतली होती. त्यासाठी ४५ जिल्ह्य़ात त्यांनी रथयात्रा जाहीर केली होती. मात्र राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळताच त्यांनी आंदोलन मागे घेतले. नर्मदानंदजी महाराज रामनवमी आणि हनुमान जयंतीचे उत्सव त्यांनी मोठय़ा प्रमाणावर आयोजित केले होते. हनुमान जन्मोत्सव समिती आणि सनातन धर्म महासभा यांच्याशी त्यांचा संबंध आहे.