मदरशांमध्ये राष्ट्रगीत म्हटले जावे हा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला होता. त्यांच्या या निर्णयावर आता अलाहाबाद हायकोर्टानेही शिक्कामोर्तब केले. योगी आदित्यनाथ यांनी ऑगस्ट महिन्यात हा आदेश लागू केला. मात्र या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मदरशांतर्फे दाखल करण्यात आली होती. हीच याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेटाळली. राष्ट्रगीतासंदर्भात मदरशांना कोणतीही सूट मिळणार नाही, असेही अलाहाबाद हायकोर्टाने स्पष्ट केले.

राष्ट्रगीत आणि तिरंग्याचा सन्मान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रगीत हे कोणत्याही जात, धर्म, भाषा आणि भेद यांच्या कक्षेत येत नाही, असेही अलाहाबाद कोर्टाने म्हटले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील ट्विट केले.

१५ ऑगस्टला मदरशांमध्ये झेंडावंदन केले जावे आणि राष्ट्रगीत म्हटले जावे, असा आदेश उत्तर प्रदेश सरकारने जारी केला होता. त्यानंतर मदरसे आणि उत्तर प्रदेश सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाले. मदरशांनी योगी सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका अलाहाबाद कोर्टात दाखल केली होती. हीच याचिका फेटाळण्यात आली आहे. उत्तरप्रदेश सरकार आमच्या देशभक्तीवर संशय घेत असल्याचा आरोपही काही मुस्लिम संघटनांनी ऑगस्ट महिन्यात केला होता.