Allahabad High Court Live-in Relationship: “एखादा विवाहित पुरुष दुसऱ्या महिलेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असेल, तर तो गुन्हा मानला जाऊ शकत नाही”, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. नैतिकता आणि कायदा या दोन भिन्न गोष्टी आहेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याला महिलेच्या कुटुंबियांकडून मिळणाऱ्या धमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी न्यायालयाकडून संरक्षण मागितले होते.
कायदा आणि नैतिकता दोन भिन्न गोष्टी – न्यायालय
व्यक्तीचे लग्न झाल्यामुळे दुसऱ्या महिलेबरोबर नात्यात राहणे गुन्हा आहे, अशा शब्दात महिलेच्या कुटुंबियांनी न्यायालयात बाजू मांडली. यावर मत नोंदवताना कायदा आणि सामाजिक नैतिकता या दोन भिन्न गोष्टी असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती जे.जे मुनीर आणि तरुण सक्सेना यांच्या खंडपीठाने याबाबत निर्णय दिला. पोलिसांनी या जोडप्याची सुरक्षेची जबाबदारी शाहजहानपूरच्या पोलिस अधीक्षकांवर सोपवली आहे.
न्यायालय काय म्हणाले?
“एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या संमतीने विवाहित पुरुष लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्यास यासाठी कोणताही गुन्हा नाही. नैतिकता आणि कायदा वेगळे ठेवायला हवेत. कायद्यानुसार कोणताही गुन्हा सिद्ध होत नसेल, तर नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सामाजिक मतं आणि नैतिकता न्यायालयाच्या कृतीला मार्गदर्शन करणार नाहीत,” असे खंडपीठाने म्हटले. दरम्यान, महिलेने ती प्रौढ असून, स्वत:च्या इच्छेने लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचा अर्ज शाहजहानपूर पोलिसांकडे सादर केल्याचे न्यायालयाचे म्हटले आहे.
संरक्षण देणे पोलिसांचे कर्तव्य – न्यायालय
महिलेच्या पालकांना देखील ते दोघे लिव्ह-इनमध्ये राहत असल्याची कल्पना आहे पण, त्यांनी दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांनी या अर्जावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे न्यायालयाला आढळून आले. “लिव्ह-इनमध्ये राहत असलेल्या दोन प्रौढ लोकांना संरक्षण देणे पोलिसांचे कर्तव्य आहे”, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या दोघांना कोणतीही इजा न पोहोचविण्यास तसेच दोघांच्या घरात प्रवेश करण्यास मनाई केली आहे.
