Liquor Smuggling in Bihar : बिहार राज्यात दारूबंदी लागू आहे. मात्र, असं असतानाही बिहारमध्ये दारू तस्करी रोखण्यास अपयश आल्याचं दिसून येतं. कारण दारूची तस्करी अनेक वेगवेगळ्या पद्धतीने आजही सुरु असल्याच्या घटना समोर येत आहेत. कधी ट्रकमधून तर कधी आणखी दुसऱ्या एखाद्या वाहनांच्या माध्यमातून दारूची तस्करी होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता बेतिया शहर परिसरातून आणखी एक अनोखी घटना उघडकीस आली आहे.

बिहारच्या बेतिया पोलिसांनी दारू तस्करीविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत चक्क एका घोड्याला ५० लिटर विदेशी दारूसह पकडण्यात आलं आहे. मात्र, जो व्यक्ती या घोड्याच्या माध्यमातून दारूची तस्करी करत होता, तो फरार झाला आहे आणि पोलिसांना घटनास्थळी फक्त घोडा आढळून आला आहे. त्यामुळे आता दारूच्या तस्करीसाठी घोड्याचा वापर होतोय का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घोड्याचा वापर उत्तर प्रदेशातून गंडक नदीच्या क्षेत्रातून दारूच्या तस्करीसाठी केला जात होता. पहाटेच्या वेळी ही तस्करी करण्यात येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असता घटनास्थळी घोडा आढळून आला, तर त्याचा मालक फरार झाला आहे. नौटन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना कथित तस्करीची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

“आम्ही घटनास्थळी छापा टाकला तेव्हा आम्हाला एक व्यक्ती घोड्यासह दिसला. पण पोलीस दिसताच तो व्यक्ती घोडा आणि दारू सोडून अंधारात पळून गेला. आता त्याची आम्ही ओळख पटवत असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच संबंधित व्यक्तीला अटक होईल, असं एका अधिकाऱ्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं. पोलिसांच्या मते गेल्या काही महिन्यांतील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. दारू तस्करीसाठी आता घोड्यांचा वापर होत आहे.

दरम्यान, रस्त्यांवर गस्त वाढल्यामुळे आता दारू तस्कर नदीकाठच्या प्रदेशाचा वापर करत दारू वाहतूक करण्यासाठी घोड्यांचा वापर करत आहेत. पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी देखील दारू तस्करीसाठी वापरला जाणारा आणखी एक घोडा जप्त केला होता. आता या घटनेत देखील पोलिसांनी संबंधित घोडा ताब्यात घेतला असून त्याला पोलीस त्याची काळजी घेण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीकडे सोपवण्याचा विचार करत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, सध्या तरी हा घोडा नौटन पोलीस ठाण्यात आणण्यात आलेला आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात घोड्याची उपस्थिती ही एक आश्चर्याची गोष्ट बनली आहे.