बिहार विधानसभा निवडणुकीला सामोर जाण्याआधीच भाजपासमोरची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेल्या लोक जनशक्ती पार्टीनं आज दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत बिहार विधानसभा निवडणूक एनडीएसोबत लढायची की, स्वतंत्र याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे लोजपाच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बिहार विधानसभा निवडणूक एनडीएतील घटक पक्ष मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली आहे. मात्र, एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं समोर येत आहे.

लोक जनशक्ती पार्टी आणि संयुक्त जनता दल (जदयू) यांच्यातील अंतर्गत कलह पुन्हा समोर येताना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून लोजपा आणि जदयूचे नेते एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. त्यातच नितीशकुमार यांनी माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनाही सोबत घेतल्यानं लोजपा नाराज आहे.

नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले लोजपाचे अध्यक्ष चिराग पासवान हे सरकारवर सातत्यानं टीका करत आहे. सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबरोरच पासवान यांनी करोनाची हाताळणी, लॉकडाउन व पूरपरिस्थितीवरून नितीश कुमार यांच्यावर टीका करत आहेत.

त्यामुळे लोजपानं आता बिहार विधानसभा निवडणूक सोबत लढायची की स्वतंत्र यासंदर्भात विचार सुरू केला आहे. दिल्लीत ही बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी रविवारी पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पत्र लिहून राज्यात हत्या करण्यात आलेल्या दलितांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री पदाच्या १५ वर्षाच्या काळातही नोकरी दिली जात नसेल, तर हा निवडणूक स्टंट समजला जाईल, असंही पासवान यांनी म्हटलं आहे.

गेल्या महिन्यातच लोजपा आणि जदयू यांच्या अंतर्गत कलह उफाळून आला होता. जदयूच्या नेत्याने चिराग पासवान यांच्यावर टीका केल्यानंतर लोजपा नाराज झाली होती. मात्र, त्यानंतर भाजपानं मध्यस्थी करत वादावर पडदा टाकला होता. त्यामुळे यावेळी भाजपा काय करते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.