ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांची अखेर तुरुंगातून सुटका झाली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा ते तिहार तुरुंगातून बाहेर पडले. उत्तर प्रदेशात झुबेर यांच्याविरोधात दाखल केलेल्या सर्व गुन्ह्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने आज अंतरिम जामीन मंजूर केला होता. तसेच झुबेर यांची तात्काळ तुरुंगातून सुटका करावी, असे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर झुबेर यांची तिहार तुरुंगातून सुटका झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत अधिक माहिती देताना झुबेर यांचे वकील सौतिक बॅनर्जी म्हणाले की, “ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांना तिहार कारागृहातून सोडण्यात आलं आहे. ते आता तुरुंगाबाहेर आहेत.” झुबेर यांना २७ जून रोजी दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती. अखेर २४ दिवसानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे.

आज न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खडंपीठासमोर ही सुनावणी पार पडली. मोहम्मद झुबेर यांना जामीन नाकारण्याचं कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. त्यामुळे त्यांना कलम ३२ अंतर्गत सर्व प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात येत आहे, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले. तसेच मोहम्मद झुबेर यांच्याविरोधातील सर्व एफआयआर दिल्ली पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात यावेत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

पाहा व्हिडीओ –

काय आहे प्रकरण?
ट्वीटच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावणे तसेच द्वेषाला उत्तेजन देणे, या आरोपांखाली झुबेर यांना २७ जून रोजी अटक करण्यात आली होती. त्यानंतर ११ जुलै रोजी त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्याआधीच झुबेर यांना जामीन मंजूर करण्यात आला. तसेच झुबेर यांनी नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावणारे तसेच लोकांना भडकावणारे ट्वीट केल्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alt news co founder mohammed zubair finally released from tihar jail rmm
First published on: 20-07-2022 at 23:09 IST