मोदी सरकार इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती स्मारकात शहिदांच्या स्मरणार्थ धगगणारा अग्नी विझवणार?; काय आहे सत्य

अमर जवान ज्योतिची स्थापना त्या भारतीय सैनिकांच्या आठवणींमध्ये करण्यात आली होती जे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झाले होते.

amar jawan jyoti Delhi
केंद्र सरकारने यासंदर्भात सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. (फाइल फोटो सौजन्य विकिपीडिया कॉमन्सवरुन साभार)

मागील ५० वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगत असणाऱ्या अमर जवान ज्योती स्मारकातील ज्वाला राष्ट्रीय युद्ध स्मारकामधील ज्वालेत आज (२१ जानेवारी २०२२ रोजी) विलीन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सन २०१९ मध्ये उद्घाटन झालेल्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन होणार आहे. आज यासंदर्भातील विशेष सोहळा आयोजित करण्यात आलाय. मात्र त्याचवेळी या विलीनीकरणानंतर अमर जवान ज्योती विझवली जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. यावरुनच आता सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अमर जवान ज्योतीमधील अग्नी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाआधी लष्करी अधिकाऱ्यांबरोबरच पंतप्रधान युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करणार आहेत.

आजच्या कार्यक्रमात नक्की काय होणार?
शुक्रवारी दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये इंडिया गेट जवळच्या अमर जवान ज्योतीमधील आग ही राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तेवत ठेवलेल्या स्मारकापर्यंत आणली जाणार आहे. इंडिया गेटजवळ असणारं राष्ट्रीय युद्ध स्मारक हे ४० एकरांवर पसरलेलं आहे. या युद्ध स्मारकामध्ये स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या २६ हजारांहून अधिक भारतीय सैनिकांचं नाव कोरलेलं आहे. येथे एक राष्ट्रीय युद्ध संग्रहालयही आहे. अमर जवान ज्योती विलीनीकरणानंतर इंडिया गेटवरील ज्वाला विझवण्यात येणार असल्याचा दावा केला जातोय.

काय आहे इतिहास?
अमर जवान ज्योतीची स्थापना त्या भारतीय सैनिकांच्या आठवणींमध्ये करण्यात आली होती जे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झाले होते. या युद्धामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर बांगलादेशची स्थापना झाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी १९७२ रोजी या स्मारकाचं उद्घाटन केलेलं. इंडिया गेटवर असणारं अमर जवान ज्योती स्मारकावर शहीद झालेल्या सैनिकांची नावं आहेत. येथे संगमरवरी खडकावर रायफर आणि सैनिकांचं हेल्मेट अशा स्वरुपातील स्मारक आहे.

का केलं जातंय विलीनीकरण?
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार वेगवेगळ्या युद्धांमध्ये देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ वेगवेगळी स्मारकं उभारण्यात आली नव्हती. त्यामुळेच इंडिया गेटवर ही ज्वाला धगधगत ठेऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली जायची. मात्र आता एक समर्पिक संग्रहालय आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक असल्याने तेथील स्मारक ज्वालेमध्ये अमर जवान ज्योतीमधील ज्वाला एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

इंडिया गेटवरील ज्योती विझवण्यात येणार?
इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती स्मारकावर १९७१ सालापासून कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या आठवणींमध्ये तेवत ठेवण्यात आलेली ज्योती विझवण्यात येणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. अमर जवान ज्योती आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकामधील ज्योती विलीन केल्या जाणार असून यानंतरही इंडिया गेटवरील ज्योती विझवण्यात येणार नाही, असं सरकारने म्हटलंय.

ती नावं कोणाची?
“अमर जवान ज्योतीसंदर्भात बरीच चुकीची माहिती फिरवली जात आहे. अमर जवान ज्योती ही १९७१ च्या युद्धातील शहिदांसाठी उभारण्यात आली असली तरी तिथे सर्व शहिदांच्या नावांचा उल्लेख नाहीय हे फार विचित्र आहे,” असं सरकारी सुत्रांनी म्हटलंय. “इंडिया गेटवरील स्मारकावर असलेली नावं हे ब्रिटीशांसाठी पहिले महायुद्ध आणि अफगाणिस्तानमधील युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांची नावं आहेत. त्यामुळे हे ब्रिटीश राजवटीच्या काळातील स्मारक आहे,” असं सुत्रांनी सांगितल्याचं इंडिया टुडेने म्हटलंय.

विरोधकांवर साधला निशाणा
सरकारने अमर जवान ज्योतीच्या मुद्द्यावरुन विरोधकांवरही निशाणा साधलाय. “ज्यांनी मागील सात दशकांमध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकही उभारलं नाही ते आता शहिदांना कायम स्वरुपी स्मरणात राहणाऱ्या स्मारकावरुन आरडाओरड करत आहेत, हे फारच विरोधाभास दर्शवणारं आहे,” असंही सरकारी सुत्रांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amar jawan jyoti not being extinguished govt quells misinformation hits out at opposition scsg

Next Story
इंडिया गेटवरील ‘अमर जवान ज्योती’ राष्ट्रीय युद्ध स्मारकात होणार विलीन; जाणून घ्या यामागील कारण
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी