इंडिया गेटवरील ‘अमर जवान ज्योती’ राष्ट्रीय युद्ध स्मारकात होणार विलीन; जाणून घ्या यामागील कारण

१९७२ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी रोजी इंडिया गेटवरील अमर जवान ज्योति स्मारकाचं उद्घाटन केलेलं.

amar jawan jyoti
आज म्हणजेच २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलाय विशेष सोहळा (फाइल फोटो)

भारत मातेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या आठवणीमध्ये मागील ५० वर्षांपासून इंडिया गेटवर धगधगत असणाऱ्या अमर जवान ज्योती राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये आज (२१ जानेवारी २०२२ रोजी) विलीन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सन २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं होतं. शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अमर जवान ज्योतीमधील अग्नी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाआधी लष्करी अधिकाऱ्यांबरोबरच पंतप्रधान युद्ध स्मारकावर पुष्पांजली अर्पण करणार आहेत.

शुक्रवारी दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये इंडिया गेट जवळच्या अमर जवान ज्योतीमधील आग ही राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तेवत ठेवलेल्या स्मारकापर्यंत आणली जाणार आहे. त्यानंतर इंडिया गेटवरील ज्वाला विझवण्यात येणार असल्याचा दावा केला जात असला तरी ही ज्योती तेवत ठेवली जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. इंडिया गेटजवळ असणारं राष्ट्रीय युद्ध स्मारक हे ४० एकरांवर पसरलेलं आहे. या युद्ध स्मारकामध्ये स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या २६ हजारांहून अधिक भारतीय सैनिकांचं नाव कोरलेलं आहे. येथे एक राष्ट्रीय युद्ध संग्रहालयही आहे.

नक्की वाचा >> मोदी सरकार इंडिया गेटवरील अमर जवान ज्योती स्मारकात शहिदांच्या स्मरणार्थ धगगणारा अग्नी विझवणार?; काय आहे सत्य

प्राप्त माहितीनुसार अमर जवान ज्योतीची स्थापना त्या भारतीय सैनिकांच्या आठवणींमध्ये करण्यात आली होती जे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान शहीद झाले होते. या युद्धामध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर बांगलादेशची स्थापना झाली होती. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २६ जानेवारी १९७२ रोजी या स्मारकाचं उद्घाटन केलेलं. इंडिया गेटवर असणारं अमर जवान ज्योती स्मारकावर शहीद झालेल्या सर्व सैनिकांची नावं आहेत. येथे संगमरवरी खडकावर रायफर आणि सैनिकांचं हेल्मेट अशा स्वरुपातील स्मारक आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार वेगवेगळ्या युद्धांमध्ये देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ वेगवेगळी स्मारकं उभारण्यात आली नव्हती. त्यामुळेच इंडिया गेटवर ही ज्वाला धगधगत ठेऊन शहिदांना श्रद्धांजली वाहिली जायची. मात्र आता एक समर्पिक संग्रहालय आणि राष्ट्रीय युद्ध स्मारक असल्याने तेथील स्मारक ज्वालेमध्ये अमर जवान ज्योतीमधील ज्वाला एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Amar jawan jyoti to be merged with national war memorial flame this is why scsg

Next Story
India Today CVoter Survey: आज लोकसभा निवडणूक झाल्यास मोदीच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार; पण भाजपाला बसेल मोठा धक्का, काँग्रेस तर…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी