राफेल विमानांच्या खरेदीमुळे भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार असल्याने हा करार देशाच्या हिताचा असल्याचे सांगत काँग्रेसने या कराराचे समर्थन केले आहे. तसेच,  ‘स्वत:च्या स्वार्थासाठी स्वामींनी देशहिताच्या आड येऊ नये,’ या शब्दांत सदर करारावर संशय उपस्थित करणारे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांना बोल सुनावले आहेत.
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी फ्रान्स सरकारसोबत केलेल्या राफेल जेट विमान खरेदी कराराचे काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी समर्थन केले आहे. राफेल करार हा देशाच्या सुरक्षेशी संबंधीत मुद्दा आहे. या कराराने भारतीय वायुसेनेची ताकद वाढणार आहे. त्यामुळेच हा करार देशाच्या हिताचा असल्याचे कॅप्टन सिंग यांनी म्हटले आहे. मात्र, भाजपचेच एक नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या कराराला विरोध दर्शवत न्यायालयात जाण्याची धमकी दिली आहे. वामी यांना मंत्रिमंडळात जागा हवी आहे. मात्र, मोदींनी त्यांना मंत्रिपद न दिल्यानेच ते हे उद्योग करीत आहेत,’ असे अमरिंदर सिंग म्हणाले.