अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वीच दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली आहे. ३० जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होत असून अशावेळी टीआरफ या दहशतवादी संघटनेचे धमकीचे पत्र आले आहे. टीआरएफकडून धमकीचे पत्र जारी करून यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. अमरनाथ यात्रा ही जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ मंदिराची यात्रा आहे जी उन्हाळ्याच्या महिन्यांत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने अमरनाथ यात्रेसंदर्भात धमकीचे पत्र जारी केले आहे. पत्रात दहशतवादी संघटनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) निशाणा साधला आहे. संघटनेचे म्हणणे आहे की ते यात्रेच्या विरोधात नाहीत, पण मात्र तोपर्यंत यात्रेकरू सुरक्षित आहेत जोपर्यंत ते काश्मीर प्रश्नात सहभागी होत नाहीत.

“ते (सरकार) अमरनाथ यात्रेचा वापर त्यांच्या घाणेरड्या राजकारणासाठी करणार आहेत. केवळ १५,००० ते ८ लाख यात्रेकरूंची नोंदणी आणि १५ ते ८० दिवसांपर्यंत केवळ काश्मीरच्या परिस्थितीची संवेदनशीलता भडकवण्यासाठी आहे. ही फॅसिस्ट राजवट अमरनाथ यात्रेच्या नावाखाली आरएसएस संघटनेला खोऱ्यात आणत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे,” असे पत्रात म्हटले आहे.

अमरनाथ यात्रा अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांचे लक्ष्य आहे. २००० मध्ये पहलगाम बेस कॅम्पवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ यात्रेकरूंसह २५ लोक मारले गेले होते. जुलै २०१७ मध्ये प्रवासी बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.

अमरनाथ यात्रा ३० जूनपासून सुरू होत असून ती ११ ऑगस्टला संपणार आहे. ४३ दिवस चालणाऱ्या अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंची संख्या पूर्वीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. या वेळी रामबन आणि चंदनवाडीत शिबिरे मोठी असतील. या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

यात्रेकरूंचा मागोवा घेण्यासाठी बार-कोड प्रणाली आणि सॅटेलाइट ट्रॅकर्ससह RFID टॅगचा वापर केला जात आहे. प्रवासाचे मार्ग आणि शिबिराच्या ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. याशिवाय काश्मीरमध्ये सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सीआरपीएफच्या ५० अतिरिक्त कंपन्यांना सामील करण्यात आले आहे.

दुसरीकडे, श्रीनगर पोलिसांनी प्रतिबंधित दहशतवादी संघटना टीआरएफच्या दोन स्थानिक दहशतवाद्यांना अटक केली आहे. १५ पिस्तूल, ३० मॅगझिन, ३०० राऊंड आणि १ सायलेन्सरसह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे पोलीस महानिरीक्षक काश्मीर यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलीस तपास करत आहेत.

जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शनिवारी या वर्षी वार्षिक अमरनाथ यात्रेशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी १५ जून ही अंतिम मुदत निश्चित केली आणि यात्रेकरूंसाठी सर्वोत्तम सुविधा सुनिश्चित करणे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे सांगितले.

सिन्हा यांनी राजभवनात उच्चस्तरीय बैठकीत यात्रेच्या तयारीचा आढावा घेतला. उपायुक्त, वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि श्री अमरनाथजी श्राइन बोर्डचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. उपराज्यपाल म्हणाले की, यात्रेकरूंसाठी सर्वोत्तम सुविधा सुनिश्चित करणे हे प्रशासनाचे प्राधान्य आहे. श्री अमरनाथजी यात्रेशी संबंधित सर्व कामे पूर्ण करण्यासाठी त्यांनी १५ जून ही अंतिम मुदत निश्चित केली. पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांनी यंदा ३० जूनपासून यात्रा सुरू होणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amarnath yatra 2022 threatened letter of terrorist organization trf before amarnath yatra abn
First published on: 23-05-2022 at 12:35 IST