अमेरिकेच्या फ्लोरिडामधील मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲमेझॉनच्या एका मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या विमानाचा अपघात झाल्यानंतर भीषण आग लागली आणि त्यामध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे. ॲमेझॉनच्या या मालवाहू विमानाचा अपघात नेमकी कसा झाला? याची चौकशी आता सरू करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मियामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ॲमेझॉनचं एक मालवाहू विमान लँडिंगचा प्रयत्न करत होतं. यावेळी या विमानाने लँडिंगही केलं. मात्र, धावपट्टीवरून पुढे जात असताना अचानक हे विमान धावपट्टीवरून घसरलं आणि थेट बाजूला असलेल्या एका पार्किंग झोनमध्ये घुसलं. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या काही वाहनांना हे विमान धडकलं. या विमानाची वाहनांना जोराची धडक झाल्यानंतर विमानाला भीषण आग लागली. त्यामुळे या घटनेत किमान पाच जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये असं दिसत आहे की, निळ्या आणि पांढऱ्या रंगाचं बोईंग ७६७ हे विमान उतरताना विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरून बाजूला उभ्या असलेल्या वाहनांना धडकताना दिसत आहे. दरम्यान, प्राइम एअर फ्लाइट ७५९८ म्हणून कार्यरत असलेल्या या विमानाने वाहनांना धडक दिल्यानंतर विमानाला भीषण आग लागल्याचं व्हिडीओत दिसत आहे. आग लागल्यानंतर विमानातून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर येताना दिसत आहेत. त्यानंतर घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आणि मदतकार्य करण्यात आलं. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.
विमानाची काही वाहनांना धडक झाली, तेव्हा काही लोक त्या वाहनांमध्ये होते, अशी माहिती मियामी येथील अग्निशमन विभागाच्या प्रमुखांनी दिली आहे. ते म्हणाले की, या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातावेळी वैमानिक आणि सह-वैमानिक कॉकपिटमध्ये, तर काही प्रवासी कारमध्ये होते. एका व्यक्तीला वाहनाखाली अडकलेल्या अवस्थेतून बाहेर काढण्यात आलं. तसेच वैमानिक वाचले आहेत की नाही? किंवा विमान धडकलं तेव्हा मृत झालेले सर्वजण वाहनांमध्ये होते का? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
ॲमेझॉनने निवेदनात काय म्हटलं?
या घटनेनंतर ॲमेझॉनने एक निवेदन जारी करत म्हटलं की, विमान लँडिंगचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली आहे. यात कोणी जखमी झालं किंवा कोणाचा मृत्यू झाला, याबद्दल अद्याप आमच्यापर्यंत माहिती आलेली नाही. मात्र, ही परिस्थिती बदलणारी आहे, त्यामुळे आम्ही या घटनेचा सविस्तर तपशील मागवत आहोत. त्यामुळे नेमकं काय घडलं हे समजून घेण्यासाठी आम्ही स्थानिक प्रशासन आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत”, असं ॲमेझॉनच्या प्रवक्त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.
