राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’ने भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’नंतर आता जगभरामध्ये आघाडीची ई-कॉमर्स कंपनी असणाऱ्या ‘अ‍ॅमेझॉन’वर निशाणा साधला आहे. ‘पांचजन्य’ने ‘अ‍ॅमेझॉन’ला ‘ईस्ट इंडिया कंपनी २.०’ असं म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीशी संबंध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पाठराखण करणाऱ्या या मासिकाचा हा सलग दुसरा वादग्रस्त अंक आहे. यापूर्वीच्या अंकामध्ये त्यांनी वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने टीका करताना ‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका उपस्थित केलेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मथळा आणि मुखपृष्ठ चर्चेत
‘पांचजन्य’चे संपादक हितेश शंकर यांनी सोमवारी ‘पांचजन्य’च्या नवीन अंकाचे मुखपृष्ठ ट्विटरवरुन शेअर केलं असून यावर ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांचा फोटो दिसत आहे. या अंकाचा मथळा, “#अ‍ॅमेझॉन: ईस्ट इंडिया कंपनी २.०” असा आहे.

नक्की वाचा >> ‘इन्फोसिस’ विरुद्ध ‘पांचजन्य’ वादात निर्मला सीतारामन यांची उडी; म्हणाल्या, “ते वक्तव्य…”

‘अ‍ॅमेझॉन’ कंपनी भारतविरोधी?
या मुखपृष्ठावर ‘अ‍ॅमेझॉन’च्या धोरणांवर टीका करणारं वाक्य लिहिण्यात आलं आहे. “या कंपनीने असं काय चुकीचं केलं आहे की त्यांना लाच द्यावी लागली… लोक ही कंपनी भारतातील नवउद्योजक, आर्थिक स्वातंत्र्य आणि संस्कृतीला धोकादायक असल्याचं का मानतात?”, असं वाक्य मुखपृष्ठावर लिहिण्यात आलं आहे.

त्या प्रकरणाची चौकशी होणार…
मागच्याच आठवड्यामध्ये भारत सरकारने भारतात ‘अ‍ॅमेझॉन’च्या कायदेशीर प्रतिनिधींकडून सरकारी अधिकाऱ्यांना लाच दिल्याच्या आरोपांची चौकशी होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘भ्रष्टाचाराविरोधात शून्य सहनशीलता’ च्या धोरणावर भर देत सरकारने २१ सप्टेंबर प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. अमेरिकन ई-कॉमर्स कंपनी असलेल्या ‘अ‍ॅमेझॉन’ने लाचखोरीच्या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी भारत सरकारचा संबंध असल्याने भ्रष्टाचाराबाबत सरकारचं धोरण शून्य सहनशीलतेचं असून प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.

८ हजार ५०० कोटींचं प्रकरण….
या प्रकरणाच्या चौकशीशीसंबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संबंधित लाचखोरीची घटना कधी आणि कोणत्या राज्यात घडली हे अहवालात स्पष्ट करण्यात आलेलं नसल्याने आधी त्याची चौकशी केली जाणार आहे. “कायदेशीर शुल्क म्हणून अ‍ॅमेझॉन ८ हजार ५०० कोटी रुपये खर्च करत आहे. या मागचा नेमका हेतू काय आहे? हे प्रकरण नेमकं कोणत्या दिशेने जात आहे, याचा तपास करण्याची वेळ आली आहे. संपूर्ण प्रणाली लाचखोरीचं काम करत असून आणि एका नामांकित कंपनीसाठी हे योग्य व्यवसाय धोरण नाही हे स्पष्टच आहे,” असं मत भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी अधिकाऱ्यांनी या प्रकरणी ‘अ‍ॅमेझॉन’ला फटकारत आणि कायदा मोडणाऱ्यांना शिक्षा करण्यासंदर्भातील वक्तव्य केलंय.

या आधी ‘इन्फोसिस’वरही साधलेला निशाणा
यापूर्वी ‘पांचजन्य’ने ‘इन्फोसिस’ कंपनीवर निशाणा साधला होता. या कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली होती. ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत, मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असेही ‘पांचजन्य’मधील लेखात म्हटलं होतं. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली आहे. ही दोन्ही पोर्टल इन्फोसिस या अव्वल भारतीय तंत्रज्ञान कंपनीने तयार केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप पांचजन्यच्या ताज्या अंकात करण्यात आलेला. ‘साख और आघात’ या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे.

तुकडे-तुकडे टोळी यांना मदत केली
‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होते, असे नमूद करून या लेखात म्हटले आहे, की अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो. सरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत, कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे. जीएसटी आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स इन्फोसिसने विकसित केली आहेत. करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे. भारतीय आर्थिक हिताविरोधात इन्फोसिसच्या माध्यमातून कुणी देशविरोधी शक्ती तर काम करीत नाहीत ना अशी शंका लेखात व्यक्त केली आहे. इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे, तुकडे-तुकडे टोळी यांना मदत केली असल्याचे आरोप आहेत, पण त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. इन्फोसिस ही कंपनी परदेशी ग्राहकांना अशीच वाईट सेवा देते का, असा सवालही लेखात करण्यात आला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amazon east india company 2 point 0 rss supporter panchjanya magazines latest after infosys attack scsg
First published on: 27-09-2021 at 12:17 IST