Amazon Engineer Shardendu Tiwari Joins Indian Army: आयटीमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी आणि कॉर्पोरेट जगतातील सुरक्षित जीवन मिळवण्याचा अनेक तरुणांचा प्रयत्न असतो. पण लखनौच्या एका तरुणाने देशातील तरुणांसमोर एक प्रेरणादायी असे उदाहरण निर्माण केले आहे. ॲमेझॉन कंपनीतील वार्षिक तब्बल ४६ लाख रुपयांच्या पॅकेजवर पाणी सोडून २७ वर्षीय शारदेंदू तिवारी भारतीय लष्करात दाखल झाले आहेत. गया (बिहार) येथील ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीमधून ते शनिवारी लष्करात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

शारदेंदू यांच्यासाठी लष्करातील प्रवेश सोपा नव्हता. तब्बल आठ वेळा त्यांना निवड प्रक्रियेत अपयशाचा सामना करावा लागला. मात्र हार न मानणाऱ्या शारदेंदू यांनी नवव्या प्रयत्नात यश मिळवले. त्यांची ‘टेक्निकल एन्ट्री स्कीम’द्वारे निवड झाली. यामुळे त्यांच्या तांत्रिक शिक्षणाचा आणि कौशल्याचा थेट फायदा लष्कराला मिळणार आहे. लष्करातील आव्हानात्मक जीवन, साहसी अनुभव आणि फिल्ड पोस्टिंगची आवड यामुळेच आपण सैन्यात येण्याचा निर्णय घेतल्याचे शारदेंदू यांनी सांगितले.

कोण आहेत शरदेंदू तिवारी?

शारदेंदू यांचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पिपरगाव येथील आहे. मात्र काही वर्षांपूर्वी ते लखनौमधील नीलमाथा येथे स्थायिक झाले. त्यांचे शालेय शिक्षण हरयाणातील चांदीमंदिर येथील केंद्रीय विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेज, चंदीगड येथून माहिती तंत्रज्ञान शाखेत बीई आणि त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स व इन्फॉर्मेशन सिक्युरिटी विषयात एम.टेक पूर्ण केले.

शारदेंदू यांच्या घरात आधीपासूनच लष्करी सेवेची परंपरा आहे. त्यांचे वडील मानद कॅप्टन राजकुमार तिवारी यांनी आर्मी सर्व्हिस कोअरमध्ये (ASC) तब्बल ३६ वर्षे सेवा बजावली आहे. वडिलांच्या लष्करी सेवेचा शारदेंदू यांच्यावर बालपणापासूनच खोल प्रभाव होता.

ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमीत प्रशिक्षण पूर्ण करताना तिवारी यांच्या नेतृत्वगुणांची दखल घेत त्यांना ‘सिनिअर अंडर ऑफिसर’ हे प्रतिष्ठेचे पद देण्यात आले होते. लष्कराची निवड करण्यापूर्वी त्यांनी केवळ अ‍ॅमेझॉनच नव्हे, तर प्रसिद्ध एरोस्पेस कंपनी ‘एअरबस’कडून आलेली नोकरीची मोठी ऑफरही नाकारली होती.

अमर सिम्हा यादवही झाले होते लष्करात दाखल

काही दिवसांपूर्वीच आयआयटी मंडीचे पदवीधर कॅप्टन अमर सिम्हा यादव यांची अशीच एक प्रेरणादायी गोष्ट सोशल मीडियावर चर्चेत आली होती. आयआयटीमधून बी.टेक केल्यानंतर यादव हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये लार्सन अँड टुब्रो (L&T) कंपनीत वरिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत होते. परदेशातील स्थैर्य आणि उत्तम पगार सोडून त्यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.

सॉफ्टवेअर अभियंता विकास अल्विस यांनी एक्सवर (ट्विटर) याबाबत माहिती दिली होती. विकास यांच्या पोस्टनुसार, आई-वडिलांची इच्छा नसतानाही यादव यांनी लष्करात भरती होण्याचा निर्धार केला. “दिवसभर खुर्चीवर बसून वजन वाढवणे आणि दृष्टी गमावण्यापेक्षा, जिथे फिट राहण्याचे पैसे मिळतात, आदर मिळतो आणि देशाची सेवा करता येते अशा लष्करात जाणे मी पसंत केले,” असे यादव यांचे म्हणणे होते.

कॅप्टन अमर सिम्हा यादव यांनी लष्करात कॉम्बॅट इंजिनिअर ऑफिसर म्हणून १२० हून अधिक जवानांच्या टास्क फोर्सचे नेतृत्व केले. लष्करात यशस्वी कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर त्यांनी नुकतीच आयआयएम कलकत्ता येथे आपल्या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे.