जपानमधील ऐतिहासिक कोयासन विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या वेळी वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार रामदास आठवले, अमर साबळे, माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आदी नेते उपस्थित होते.

हे विद्यापीठ १२०० वे स्थापना वर्ष साजरे करीत आहे, तर आंबेडकर यांची १२५ वी जयंती भारतासह जगभरात साजरी होत आहे. हा एक अपूर्व असा योगायोग असून, महाराष्ट्र व भारताच्या जनतेकडून बाबासाहेबांचा पुतळा ही जपानच्या नागरिकांना दिलेली अमूल्य भेट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
बाबासाहेबांची प्रख्यात विधितज्ज्ञ, नेते आणि समाजसुधारक अशी जगभर ओळख आहे. बुद्ध धम्माची शिकवण व तत्त्वे त्यांनी आयुष्यभर जपली, त्यातून त्यांनी अनेकांचे आयुष्य समृद्ध केले. विषमताग्रस्त भारतीय समाजाला त्यांनी समतेच्या मुल्यांची शिकवण दिली. त्यांनी जिथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला, त्या नागपूर शहरातून मी आलो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे उद्गार फडणवीस यांनी काढले.
वाकायामाचे गव्हर्नर निसाका म्हणाले की, कोयासनसारख्या बौद्धसंस्कृतीच्या सर्वाधिक प्राचिन अध्ययन केंद्रात बाबासाहेबांचे स्मारक होणे ही बाब अतिशय वैशिष्टय़पूर्ण व गौरवास्पद आहे.