Ameria Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरूच असून यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराण आक्रमक पद्धतीने अमेरिका-इस्रायलवर प्रतिहल्ले करत आहे. यामध्ये इराणने यूएईच्या दुबई आणि अबू धाबीसह अनेक शहरात हवाई हल्ले केले. त्यामुळे हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जाते.
असं असतानाच यूएईमधील एका उद्योगपतीने अमेरिकेवर संताप व्यक्त केला आहे. ‘आम्हाला युद्धात ओढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?’, असं म्हणत यूएईमधील अब्जाधीश उद्योगपती खलफ अहमद अल हब्तूर यांनी अमेरिकेवर संताप व्यक्त केला. तसेच याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहून काही सवाल विचारले आहेत.
दरम्यान, उद्योगपती खलफ अहमद अल हब्तूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना खुलं पत्र लिहित इराणबरोबर अमेरिकेच्या सुरू असलेल्या लष्करी संघर्षात आखाती आणि मध्य पूर्वेतील देशांना ओढण्याच्या त्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
“तुम्ही आखाती देशांना आणि अरब देशांना अशा धोक्याच्या केंद्रस्थानी आणून ठेवलं आहे, जे त्यांनी कधीही निवडलं नव्हतं. देवाचे आभार, आम्ही स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम आहोत. आमच्याकडे आमच्या मातृभूमीचं रक्षण करणारे सैन्य आणि संरक्षण आहे. मात्र, प्रश्न हा आहे की, आम्हाला युद्धात ओढण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”, असा सवाल उद्योगपती खलफ अहमद अल हब्तूर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना केला.
سيادة الرئيس دونالد ترامب،
— Khalaf Ahmad Al Habtoor (@KhalafAlHabtoor) March 5, 2026
سؤال مباشر: من أعطاك القرار لزجّ منطقتنا في حرب مع #إيران؟ وعلى أي أساس اتخذت هذا القرار الخطير؟
هل حسبتَ الأضرار الجانبية قبل أن تضغط على الزناد؟ وهل فكّرت أن أول من سيتضرر من هذا التصعيد هي دول المنطقة!
من حق شعوب هذه المنطقة أن تسأل أيضاً: هل كان…
“तुमचं युद्ध शेजारी राष्ट्रांशी नाही”, यूएईचा इराणला इशारा
यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचे सल्लागार अन्वर गर्गश यांनी आखाती देशात इराणने केलेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्यांनी म्हटलं की, “आखाती देशांविरुद्ध इराणच्या आक्रमकतेमुळे त्यांचं लक्ष्य चुकलं आणि एका महत्त्वाच्या वेळी इराण एकाकी पडलं. मात्र, तुमचं (इराणचं) युद्ध तुमच्या शेजारी राष्ट्रांशी नाही. हा तणाव वाढवून तुम्ही अशा लोकांच्या मतांना पुष्टी देत आहात जे इराणला धोक्याचा मुख्य स्रोत मानतात आणि त्याचा क्षेपणास्त्र कार्यक्रम अस्थिरतेचं प्रतीक मानतात. तणावाचं वाढतं वर्तुळ आणखी वाढवण्यापूर्वी शुद्धीवर या. तुमच्या सभोवतालच्या परिस्थितीकडे लक्ष द्या आणि तुमच्या शेजारी राष्ट्रांशी तर्कशुद्ध आणि जबाबदारीने वागा”, अशा शब्दांत युएईने काही दिवसांपूर्वीच इराणला सुनावलं.
इराणच्या अध्यक्षांचा इस्त्रायलला इशारा
अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा इशारा इराणने दिला. इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले की, “सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेणं हे इस्लामिक रिपब्लिकचा हक्क आणि कर्तव्य आहे. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण या गुन्ह्याच्या गुन्हेगारांचा आणि सूत्रधारांचा बदला घेणं हे कायदेशीर कर्तव्य आणि अधिकार मानतो”, असं मसूद पेझेश्कियान यांनी एका निवेदनात नुकतंच म्हटलं.
