Iran Israel War : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यानंतर इराणने आणखी आक्रमक भूमिका घेत प्रतिहल्ले सुरू केले आहेत. या सर्व घडामोडी सुरू असतानाच दुसरीकडे अमेरिकेने हिंद महासागरात इराणच्या नौदलाची ‘आयआरआयएस देना’(IRIS Dena) ही युद्धनौका बुधवारी उद्ध्वस्त केली.
श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून जवळ असलेल्या इराणच्या ‘आयआरआयएस देना’(IRIS Dena) या युद्धनौकेला अमेरिकेने लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात तब्बल ८० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. ‘आयआरआयएस देना’ या इराणी युद्धनौकेला अमेरिकेने उद्ध्वस्त करण्याच्या आधी भारताने इराणच्या ‘आयआरआयएस लावन’ (IRIS Lavan) या युद्धनौकेला आपत्कालीन डॉकिंगची परवानगी दिली होती अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी दिल्याचं इंडिया टुडेनी एका वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे इराणची ‘आयआरआयएस लावन’ (IRIS Lavan) ही युद्धनौका अडचणीत सापडली होती. त्यामुळे संकटात सापडलेल्या ‘आयआरआयएस लावन’ या इराणी युद्धनौकेला भारताने कोचीमध्ये आपत्कालीन आश्रय दिला होता आणि त्यावरील जवळपास १८३ खलाशांच्या राहण्याची व्यवस्था केली होती असं वृत्तात म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर काय म्हणाले?
“अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धादरम्यान भारताने भू-राजकीय घटकांचा विचार न करता मानवतेचा विचार करून इराणी नौदलाच्या ‘आयआरआयएस लावन’ या जहाजाला कोचीतील बंदरात उतरण्याची परवानगी दिली होती. हिंद महासागरात अमेरिकन पाणबुडीने इराणच्या ‘आयआरआयएस देना’ या जहाजाला बुडवलं हे दुर्दैवी आहे. मात्र, ज्या दिवशी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले, त्या दिवशी भारताला इराणकडून संदेश मिळाला होता की त्यांचं एक जहाज आपल्या बंदरात येऊ इच्छित आहे. त्यांच्या जहाजाला काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यानंतर इराणी नौदलाच्या ‘आयआरआयएस लावन’ या जहाजाला कोची बंदरात आश्रय दिला. मात्र, कायदेशीर मुद्दे काहीही असले तरी आम्ही मानवतेच्या दृष्टिकोनातून परिस्थितीकडे पाहिले आणि पाहतो. मला वाटतं की आम्ही योग्य काम केलं”, असं परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेने उद्ध्वस्त केलेल्या इराणी युद्धनौकेने मदतीसाठी भारताला पाठवला होता संदेश
अमेरिकेने हिंद महासागरात इराणच्या नौदलाची युद्धनौका बुधवारी उद्ध्वस्त केली. श्रीलंकेच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर असलेल्या इराणच्या ‘आयआरआयएस देना’(IRIS Dena) या युद्धनौकेला अमेरिकेने लक्ष्य करत हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास ८० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं. अमेरिकेने हल्ला केल्यानंतर ‘आयआरआयएस देना’ही इराणी युद्धनौका जेव्हा पाण्यात बुडायला लागली तेव्हा युद्धनौकेने SOS कॉल (आपत्कालीन परिस्थितीत तातडीचा संदेश) पाठवला होता अशी माहिती भारतीय नौदलाने एका निवेद्वारे दिली.
भारतीय नौदलाने निवेदनात म्हटलं की, “इराणी युद्धनौकेचा मदतीसाठी तातडीचा संदेश मिळाल्यानंतर लगेचच भारतीय नौदलाने ताबडतोब शोध मोहीम सुरू केली. ४ मार्च रोजी सकाळी कोलंबोमधील सागरी बचाव समन्वय केंद्राला ‘आयआरआयएस देना’कडून संकटाचा संकेत मिळताच भारतीय नौदलाने कोणताही विलंब न करता बचाव मोहीम सुरू केली. श्रीलंकेच्या नेतृत्वाखालील शोध मोहीम प्रयत्नांना मदत करण्यासाठी एक लांब पल्ल्याचे सागरी गस्त जहाज पाठवण्यात आलं. तसेच जवळच तैनात असलेलं आयएनएस तरंगिनी हे जहाज देखील बचाव कार्यात मदत करण्यासाठी पाठवण्यात आलं. तोपर्यंत श्रीलंकेच्या नौदलाने आणि इतर एजन्सींनी शोध मोहीम सुरू केली होती”, असं भारतीय नौदलाने निवेदनात म्हटलं.
