Iran US War : अमेरिका-इराणमधील संघर्षावर अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. ८ एप्रिल रोजी युद्धविरामाची फक्त घोषणा करण्यात आली असली तरी सध्या अमेरिका-इराणमध्ये मोठा तणाव आहे. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीची अमेरिकेने घोषणा केल्यानंतर या दोन्ही देशांतील तणाव हा आणखी वाढल्याचं चित्र आहे. एकीकडे शांतता करारासाठी चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दररोज वेगवेगळे विधाने करत इराणला धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे.
दरम्यान, अमेरिका-इराणमधील संघर्ष कधी संपणार? याकडे जगाचं लक्ष लागलेलं असतानाच आता अमेरिकेने एक मोठा निर्णय घेतला असून या निर्णयाचा थेट परिणाम भारतावरही होणार आहे. अमेरिकेने इराण आणि रशियाच्या तेल खरेदीवर पुन्हा निर्बंध लादले आहेत. एका महिन्यांपूर्वी भारताने रशियाकडून तेल आयात करण्यासाठी अमेरिकेने ३० दिवसांची सूट दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.
त्याबाबत अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट शेअर केली होती आणि त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, “भारताने रशियाकडून तेल आयात करावं, यासाठी अमेरिका ३० दिवसांची सूट देत आहे. ही तात्पुरती सूट असून सध्या समुद्रात उभ्या असलेल्या जहाजांना लागू आहे.” दरम्यान, आता अमेरिकेने याबाबतच मोठा निर्णय घेतला असून ही सवलत रद्द केली आहे. त्यामुळे याचा भारतावर परिणाम होऊ शकतो.
अमेरिकेने कोणता निर्णय घेतला?
अमेरिका-इराण युद्धामुळे समुद्रात उभ्या असलेल्या तेलाच्या जहाजांच्या खरेदीवरील निर्बंधाची ३० दिवसांची सवलत देण्याचा निर्णय एका महिन्यापूर्वी अमेरिकेने घेतला होता. मात्र, आता अमेरिकेने महत्वाचा निर्णय घेत रशिया-इराणच्या तेलावरील ३० दिवसांची सवलत रद्द केली आहे. तसेच ही मुदत आता वाढवली जाणार नसल्याचंही अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांनी वॉशिंग्टनमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
स्कॉट बेसेन्ट यांनी काय म्हटलं?
“आता आम्ही रशियन तेलावरील निर्बंधमाफीबाबत नूतनीकरण करणार नाही. तसेच आम्ही इराणच्या तेलावरील सर्वसाधारण परवान्याचंही नूतनीकरण करणार नाही. कारण ११ मार्चपूर्वी ते तेल सागरी हद्दीत होतं, त्यामुळे ते सर्व सर्व वापरलं जावं म्हणून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता ते सागरी हद्दीतील तेल संपलं आहे”, असं बेसेन्ट यांनी म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

अमेरिकेने तेलावर ३० दिवसांची सूट का दिली होती?
पश्चिम आशियात तणाव निर्माण झाल्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी जहाजांची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे अनेक तेलांची जहाजे समुद्रात अडकून पडले होते. याचा परिणाम असा झाला होता की जगातील अनेक देशांच्या तेल पुरवठ्यावर ताण आला होता. त्यामुळे अशा परिस्थितीत अधिक प्रमाणात बॅरल तेल आंतरराष्ट्रीय बाजारात पोहोचू देण्याचं आणि कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत करणं आणि गगनाला भिडणाऱ्या तेलाच्या किंमती नियंत्रणात ठेवणं हा या मागचा हेतू होता असं सांगण्यात आलं होतं.
भारतावर काय परिणाम होणार?
समुद्रात अडकून पडलेल्या रशियन तेलाच्या जहाजांच्या खरेदीवरील सवलतीचा मोठा फायदा भारताने घेतला. भारतीय तेल कंपन्यांनी मार्च आणि एप्रिलमध्ये रशियन तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे भारताला त्याचा मोठा फायदा झाला. मात्र, आता ही सवलत रद्द करण्यात आल्यामुळे रशियाकडून भारताकडे होणाऱ्या तेलाच्या प्रवाहात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, असं असलं तरी भविष्यात भारताच्या तेल आयातीवर रशियन तेलाचेच वर्चस्व राहण्याची शक्यता कायम आहे.

अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट काय म्हटलं होतं?
इराणबरोबर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला रशियाकडून तेलखरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सूट दिली होती. तेव्हा अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं होतं की, ‘अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या ऊर्जा क्षेत्रातील धोरणामुळे तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन सर्वोच्च पातळीवर पोहोचलं आहे. जागतिक बाजारपेठेत तेलाचा पुरवठा खेळता राहावा, यासाठी भारतातील तेल कंपन्यांना रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी ३० दिवसांची सूट देण्यात येत आहे. या महिनाभराच्या सवलतीमुळे रशियाचा फार मोठा फायदा होणार नाही. कारण समुद्रामध्ये अडकून पडलेल्या तेलाच्या खरेदीचाच या व्यवहारामध्ये समावेश आहे. भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे. भारत अमेरिकेकडून तेल खरेदी वाढवेल अशी अपेक्षा आहे. जागतिक ऊर्जाक्षेत्र आपल्याच प्रभावाखाली असल्याच्या इराणच्या प्रयत्नांना त्यामुळे यश येणार नाही.’
