Iran-US War Update : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध तब्बल एका महिन्यानंतर थांबलं आहे. ८ एप्रिल रोजी युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. सध्या या युद्धाच्या शांतता करारावर पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये चर्चा पार पडत आहेत. या चर्चेसाठी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे.डी.व्हान्स आणि इराणचं शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये दाखल झालं असून सविस्तर चर्चा सुरू आहे. मात्र, असं असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

अमेरिकेने कतारसह आदी देशातील इराणची गोठवलेली सर्व संपत्ती परत करण्याबाबत सहमती दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सने दिलं आहे. मात्र, एका अमेरिकी अधिकाऱ्याने हा दावा फेटाळून लावला आहे.

वृत्तानुसार, एका वरिष्ठ इराणी सूत्राने सांगितलं की, ‘अमेरिकेने गोठवलेला निधी परत करण्यास सहमती दर्शवली आहे. त्यामुळे इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींमधील गांभीर्य लक्षात येत आहे. हे पाऊल होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग सुनिश्चित करण्याशी थेट संबंधित आहे. जो एक महत्त्वाचा जागतिक तेल वाहतुकीचा मार्ग असून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.’

तसेच आणखी एका इराणी सूत्राने असं सांगितलं की, इराणने कतारच्या बँकांमध्ये ठेवलेले अंदाजे ६ अब्ज डॉलर्स सोडण्यास अमेरिकेने सहमती दर्शवली आहे. अमेरिकेने इराणवर निर्बंध लादल्यापासून म्हणजे २०१८ मध्ये गोठवण्यात आलेला हा निधी दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून वादाचा मुद्दा राहिलेला आहे. दरम्यान, या दाव्याबाबत अद्याप अमेरिकेकडून अधिकृत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तसेच कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानेही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, हा कथित निधी इराणच्या तेल महसुलातून आला आहे. जो दोहाच्या मध्यस्थीने झालेल्या अमेरिका-इराण कैदी अदलाबदलीचा भाग म्हणून २०२३ मध्ये कतारला हस्तांतरित करण्यापूर्वी दक्षिण कोरियाच्या बँकांमध्येही ठेवण्यात आला होता. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर हा निधी पुन्हा गोठवण्यात आला होता आणि अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की इराणला भविष्यात हा पैसा मिळणार नाही.

इस्लामाबादमधील बैठकीत काय ठरणार?

पाकिस्तानने मध्यस्थी केल्यानंतर अमेरिका व इराणने शस्त्रसंधीची घोषणा केली. त्यानंतर काही तासांतच इस्रायलने लेबनॉनमधील इराणचे समर्थन असलेल्या हेजबोल्ला संघटनेवर हल्ला केला. तसेच लेबनॉनची राजधानी बैरूतवर देखील बॉम्बवर्षाव केला. त्यात २५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे अमेरिका व इराणमधील शस्त्रसंधी करार धोक्यात आला होता. इस्रायल व लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी करण्याची मागणी इराणने अमेरिकेकडे केली. अमेरिकेने इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी संपर्क साधून त्यांना लेबनॉनबरोबर वाटाघाटी करण्यास तयार केले. तसेच लेबनॉनबरोबर संघर्ष आणखी न वाढवण्याचे आवाहन केले. या पार्श्वभूमीवर इराण व अमेरिकेची इस्लामाबादेत बैठक होते की नाही? याबाबत काल साशंकता होती. अखेर ही बैठक आज (११ एप्रिल) इस्लामाबादमध्ये होत असून अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स हे बैठकीसाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होणार? याकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे.