अमेरिकी ओलिस महिला कायला म्युलर जॉर्डनने सीरियाच्या राका शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात मारली गेल्याचे इसिसने म्हटले असले तरी तो दावा व्हाइट हाऊसला मान्य नाही, पण ती मारली गेली हे खरे आहे, असे असले तरी अतिरेक्यांना खंडणी न देण्याचे आमचे धोरण कायम आहे असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
  ज्या लोकांच्या कुटुंबातील लोक अशा प्रकारे मारले जातात त्यांच्याबाबत आपल्याला सहानुभूती आहे व अतिरेक्यांच्या कृत्याबाबत संताप आहे असे त्यांनी सांगितले.
कायला म्युलर (वय २६) यांना ऑगस्ट २०१३ मध्ये सीरियातील अलेप्पो येथून पळवण्यात आले होते. त्या मदतकार्य करण्यासाठी तेथे गेल्या होत्या.
 युरोपीय देशांनी त्यांच्या लोकांना अतिरेक्यांच्या तावडीतून सोडवण्यासाठी खंडणी दिली त्यामुळे अमेरिकी नागरिकांच्या सुटकेसाठी खंडणी दिली जावी व त्यासाठी धोरणात बदल करावा यासाठी ओबामा प्रशासनावर दबाव आहे.
त्यावर ओबामा यांनी सांगितले की, अशा प्रकारे खंडणी दिली तर ती दहशतवादाला मदत ठरेल व इसिस जास्त अमेरिकी लोकांना ओलिस ठेवून खंडणी मागेल. सीरियात खास कारवाई करून म्युलर यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला होता असा दावा त्यांनी केला.