दक्षिण चीन सागरातील चीनच्या वाढत्या दादागिरीला अमेरिकेने अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. समुद्रातील वादग्रस्त प्रदेशात अमेरिकेने नौदलाच्या युद्धनौकांच्या फेऱ्या वाढलेल्या असताना मंगळवारी अमेरिकन नौदलाच्या २० F-18 फायटर जेट विमानांनी दक्षिण चीन सागरातील वादग्रस्त प्रदेशात गस्त घातली. अमेरिकेचे हे शक्तिप्रदर्शन एकप्रकारे चीनसाठी खुले आव्हान आहे.

F-18 विमानांनी आकाशात आपले कौशल्य दाखवल्यानंतर या विमानांनी अमेरिकन विमानवाहू युद्धनौका यूएसएस थियोडोर रूजवेल्टवर लँडींग केले. यूएसएस थियोडोर रूजवेल्ट फिलीपाईन्सच्या दिशेने चालले आहे. दक्षिण चीन सागरात गस्त घालणारा अमेरिका एकमेव देश नसून चीन, जपान आणि अन्य देशही गस्त घालत असतात. फायटर जेट विमानांचे हे उड्डाण नियमित सरावाचा भाग होता असे अमेरिकेने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी चीननेही दक्षिण चीन सागरात आपल्या नौदल आणि हवाई शक्तिचे प्रदर्शन केले होते. चीन संपूर्ण दक्षिण चीन सागरावर आपला हक्क सांगत असून त्यावरुन त्यांचे शेजारी देशांबरोबर वाद आहेत. चीनला या समुद्रातील नैसर्गिक साधन संपत्तीचे स्त्रोत हवे असून त्यासाठी चीन कुठल्याही थराला जाऊ शकतो. चीनने इथे कृत्रिम बेटांची उभारणी सुरु केली आहे.