Florida Plane Crash Pilot Last Audio ATC : अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील खासगी लिअरजेट ६० या व्यावसायिक जेट विमानाचा भीषण अपघात झाला. पाम बीच काउंटीमधील ग्रीनएकर्स येथील निवासी भागाजवळ रविवारी दुपारी हे विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानामधील सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला. अपघातापूर्वी विमानातील वैमानिकांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. विमानावरील नियंत्रण सुटत असल्याचे लक्षात आल्यानंतर वैमानिक मदत मिळावी यासाठी विनंत्या करीत असल्याची माहिती या ऑडिओ क्लिपद्वारे मिळाली आहे. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरले. विमान निवासी इमारती आणि वाहनांच्या जवळ कोसळले असले, तरी त्या भागातील कोणाचीही जीवितहानी झाल्याचे किंवा कोणालाही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त मिळालेले नाही.

एटीसीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमधून समोर आलेले शेवटचे क्षण

विमान दुर्घटनेपूर्वीच्या अत्यंत नाट्यमय वाटणाऱ्या हालचाली हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या ऑडिओ रेकॉर्डिंगमधून समोर आल्या आहेत. हवामानाची परिस्थिती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर वैमानिकांनी तातडीने मदतीसाठी ‘मेडे’ कॉल केला होता. विमानाचा वेग नियंत्रणाबाहेर गेला असून ते प्रतिमिनिट तब्बल २० हजार ते ३० हजार फूट वेगाने खाली जात असल्याची माहिती क्रू मेंबर्सनी दिली होती. “आम्ही मरणार आहोत, आमच्याकडे वेळ उरलेला नाही,” असे विमानातील एका महिला कर्मचाऱ्याचे अंतिम शब्द या रेकॉर्डिंगमध्ये कैद झाल्याचे वृत्त आहे.

हवामान आणि तांत्रिक बाबींवर तपास सुरू

उड्डाणादरम्या वैमानिकांनी विमानाला हलकी हिमवृष्टी, मध्यम स्वरूपाचे टर्बुलन्स आणि हवामानातील बदलांचा सामना करावा लागत असल्याची माहिती एटीसीला दिली होती. विमान जवळपास ३५ हजार फूट उंचीवरून अचानक वेगाने खाली आले आणि मॉनिटरी ट्रेलजवळ कोसळले. फ्लोरिडाचे गव्हर्नर र्रॉन डिसाँटिस यांनी विमानाचे खाली कोसळणे हे एखादे क्षेपणास्त्र कोसळल्यासारखे भासले, असे म्हटले. अमेरिकेचे परिवहन सचिव शॉन डफी यांनी या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

फेडरल एव्हिएशन प्रशासन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड यांनी या अपघाताची चौकशी सुरू केली असून, विमानातील उड्डाणविषयक नोंदी, कॉकपिटमधील संभाषण, हवामानाची स्थिती आणि अन्य उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत. मात्र, विमान कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.