पीटीआय, इस्लामाबाद
अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षाच्या समाप्तीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना वेग आला असला, तरी शांतता कराराच्या अंतिम टप्प्याबाबत संभ्रम कायम आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी पुढील २४ तासांत करार अंतिम होण्याची शक्यता व्यक्त केली. मात्र, इराणने रविवारी करारावर स्वाक्षरी होणार नसल्याचे स्पष्ट केल्याने अनिश्चितता कायम आहे.
‘शांतता करार यापूर्वी कधीही इतका जवळ आला नव्हता. पुढील २४ तासांत तो अंतिम होण्याची शक्यता आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करारावर स्वाक्षर्या होतील आणि पुढील आठवड्यात तांत्रिक स्तरावरील चर्चा सुरू होतील’, असे शरीफ यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटले. अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचा अंतिम मजकूर तयार झाल्याचा दावा शरीफ यांनी शुक्रवारीही केला होता. पाकिस्तान दोन्ही देशांशी संपर्क साधून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शरीफ यांच्या दाव्याला अद्याप अमेरिकेकडून किंवा इराणकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही काही दिवसांत सामंजस्य करारावर स्वाक्षर्या होऊ शकतात, असे म्हटले आहे.
या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजार, तेलवाहतूक आणि मध्यपूर्वेतील सुरक्षा व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. पाकिस्तानने या संघर्षात मध्यस्थाची भूमिका स्वीकारली असून, एप्रिलमध्ये इस्लामाबाद येथे पहिल्या शांतता चर्चेचे यजमानपदही भूषविले होते.
इराणची सावध भूमिका
कराराबाबत इराणने मात्र काहीशी सावध भूमिका घेतली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी ‘इस्लामाबाद सामंजस्य करार’ अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत दिले, मात्र करारातील तपशिलांबाबत तर्कवितर्क टाळण्याचे आवाहन त्यांनी केले. दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी रविवारी करारावर स्वाक्षरी होणार नसल्याचे स्पष्ट केले. दुसर्या पक्षाच्या साशंक भूमिकेमुळे स्वाक्षरीच्या तारखेबाबत कोणतेही ठोस विधान करणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.
चर्चेतील प्रमुख मुद्दे
– इराणचा अणुकार्यक्रम रोखणे
– संवर्धित युरेनियमचा साठा ताब्यात घेणे
– अमेरिकेकडून निर्बंध सवलत
– होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाजवाहतुकीची सुरक्षा
इराणबरोबरच्या करारावर रविवारी स्वाक्षरी होईल. त्यानंतर होमुर्झ सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली जाईल. ही प्रक्रिया तातडीने होईल अशी अपेक्षा आहे. जर करार झाला नाही, तर आमच्याकडे अन्य पर्याय उपलब्ध आहेत. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
