America Iran Peace Treaty updates: गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियात धगधगत असलेल्या युद्धाला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध संपवण्यासाठी एक ऐतिहासिक शांतता करार (MoU) झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्याची माहिती अमेरिकन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या ऐतिहासिक घडामोडीमुळे जागतिक बाजारावर आणि आंतरराष्ट्रीय राजकारणावर याचे मोठे सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहेत. जी-७ (G7) परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या मित्रराष्ट्रांसोबत या कराराच्या तपशिलांवर सविस्तर चर्चा केल्याचेही सांगितले.
‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तील वाहतूक वाढली
फ्रान्समध्ये पार पडलेल्या ‘जी-७’ (G7) परिषदेच्या सांगता समारंभात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी या कराराची माहिती दिली. ते म्हणाले, “या अंतरिम करारामुळे जगावरील मोठे आर्थिक संकट टळले आहे. गेल्या तीन दिवसांत ‘हॉर्मुझच्या सामुद्रधुनी’तील सागरी वाहतूक कमालीची वाढली असून, मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे.”
यावेळी इराणला इशारा देताना ट्रम्प त्यांच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत म्हणाले, “इराणी लोक हुशार आहेत, त्यांनी या कराराचा आदर करावा अशी माझी इच्छा आहे. पण जर त्यांनी नियमांचे उल्लंघन केले, तर आम्ही त्यांच्यावर पुन्हा भीषण बॉम्बहल्ला करू.”
या करारातील १४ कलमांमध्ये काय आहे?
१) इराणला कच्च तेल आणि पेट्रोकेमिकल्स संबंधीच्या ज्या अटी घालण्यात आल्या आहेत त्या मुक्त करण्यात येतील.
२) इराणच्या वित्तीय संस्थांना पूर्ण अधिकार मिळेल, अमेरिका त्यांचे निर्बंध मागे घेईल.
३) ६० दिवसांमध्ये इराणचे जे २४ अब्ज डॉलर गोठवण्यात आले होते त्यावरचे निर्बंध हटवण्यात येतील
४) इराणच्या पुनर्बांधणीसाठी अमेरिका आणि मित्र राष्ट्र, इराणला ३०० अब्ज डॉलर्सच्या योजना सादर करेल.
५) लेबनॉनसह सर्व युद्ध तातडीने बंद केले जाईल.
६) अमेरिका इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे आणि इराणच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचे वचन देईल.
७) अमेरिकेने जी नाकेबंदी इराणजवळ लावली ती ३० दिवसाच्या आत पूर्णपणे हटवली जाईल
८) अमेरिकेचे सैन्य इराणच्या कोणत्याही भागात राहणार नाही आणि तिथून निघून जाईल.
९) होर्मुज खाडी पूर्ण सुरक्षेचा विचार करत ३० दिवसांच्या आत पुन्हा सुरू होईल.
१०) अणुविषयक मुद्द्यांवर आणि निर्बंध पूर्णपणे उठवण्याबाबत अंतिम करारापर्यंत पोहोचण्यासाठी ६० दिवसांचा वाटाघाटींचा कालावधी सुरू होईल.
११) इराण अणुशस्त्रे न बनवण्याबाबतच्या आपल्या NPT अणुप्रसारबंदी करार अंतर्गत असलेल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करेल.
१२) अमेरिका या प्रदेशातील आपली लष्करी उपस्थिती न वाढवण्यास किंवा नवीन निर्बंध न लादण्यास सहमती दर्शवेल.
१३)अंमलबजावणी पाहण्यासाठी एक देखरेख यंत्रणेची व्यवस्था केली जाईल. कोणत्याही अंतिम कराराला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे मान्यता दिली जाईल.
१४) इराणचा क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि तिथल्या रेझिस्टन्स ग्रुप्सना मिळणारा पाठिंबा हे या कराराचा भाग नाहीत.
थोडक्यात सांगायचं तर काय आहे या ऐतिहासिक करारात?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अंतरिम कराराचे मसुदे समोर आले असून त्यानुसार खालील प्रमुख घडामोडी घडणार आहेत:
- करारावर स्वाक्षरी होताच इराण आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘हॉर्मुझ सामुद्रधुनी’चा सागरी मार्ग तातडीने पूर्णपणे मोकळा करेल.
- इराणला आंतरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कोणत्याही निर्बंधांशिवाय कच्च्या तेलाची विक्री करण्याची परवानगी मिळेल.
- युद्धानंतर इराणच्या पुनर्उभारणीसाठी सुमारे ३०० अब्ज डॉलर्सचे (सुमारे २५ लाख कोटी रुपये) आर्थिक पॅकेज दिले जाण्याची शक्यता आहे.
- इराणच्या अणू कार्यक्रमावर अंतिम तोडगा निघाल्यास, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्र इराणवरील सर्व आर्थिक निर्बंध मागे घेतील.
६० दिवसांचा अवधी आणि अंतिम बोलणी
स्वाक्षरीनंतर दोन्ही देशांना अंतिम वाटाघाटींसाठी ६० दिवसांचा वेळ मिळणार आहे. या काळात इराणचा अणू कार्यक्रम, शिल्लक असलेले आर्थिक निर्बंध आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या नियमांवर सविस्तर चर्चा होऊन अंतिम करार केला जाईल. ‘जी-७’ देशांच्या प्रमुखांनीही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी आंतरराष्ट्रीय वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना सुरू राहने जागतिक व्यापारासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
करारानंतरही इराणचे ड्रोन हल्ले सुरूच; अमेरिकेची कारवाई
एकीकडे कराराची प्रक्रिया सुरू असतानाच, दुसरीकडे इराणकडून प्रक्षोभक कारवाया सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकन वृत्तसंस्था ‘एनबीसी न्यूज’ (NBC News) ने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारपासून इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) कडून हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत व्यापारी जहाजांना लक्ष्य करून दररोज रात्री ड्रोन हल्ले केले जात आहेत. तथापि, अमेरिकन लष्कराने हे ड्रोन हवेतच नष्ट करून व्यापारी जहाजांचे रक्षण केले आहे.
युद्धाचा जगाला बसला होता मोठा फटका
२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या एअरस्ट्राईकनंतर या भीषण युद्धाची ठिणगी पडली होती. या युद्धामुळे जागतिक पातळीवर इंधनाचे दर गगनाला भिडले होते, महागाईचा भडका उडाला होता आणि विकसनशील देशांसमोर अन्नधान्याच्या पुरवठ्याचे मोठे संकट उभे राहिले होते. अब या नव्या करारामुळे जागतिक बाजारपेठेला आणि पर्यायाने भारतालाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
