वृत्तसंस्था, इस्लामाबाद, वॉशिंग्टन, दुबई,
कैरो अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी पाकिस्तानने दोन्ही देशांना प्रस्ताव पाठविला आहे. पाकिस्तानमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. लेबनॉन आणि इस्रायलमध्येही अमेरिकेमध्ये चर्चेला सुरुवात होत आहे. चर्चेच्या या सकारात्मक वातावरणामुळे तेलाचे दर प्रतिबॅरल शंभर डॉलरखाली आले.

अमेरिका आणि इराणमध्ये १९७९नंतर प्रथमच पाकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात चर्चा झाली. पण, ती निष्फळ ठरली. अमेरिका आणि इराणने पुन्हा आपली शिष्टमंडळे पाठवावीत, असा प्रस्ताव दोन्ही देशांना पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भेटीची तारीख अद्याप निश्चित ठरली नसली, तरी आठवडाअखेर शुक्रवार ते रविवारदरम्यान ही चर्चा होऊ शकते, असे इराणमधील सूत्रांनी सांगितले.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीही इराणबाबत सकारात्मक वक्तव्ये केली. इराणने शांतता करार करण्यासाठी आपल्याशी संपर्क साधल्याचे ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले होते. इराणने अण्वस्त्रे बाळगण्याचा उल्लेख असलेल्या कुठल्याही कराराला परवानगी देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी एका मुलाखतीत सांगितले, की इराणबरोबरील चर्चा अनेक बाबतीत सकारात्मक पातळीवर पुढे गेली आहे. अमेरिकेला जिथे शक्य आहे, तिथे सवलत दिली आहे. मात्र, अण्वस्त्रांच्या बाबतीत ट्रम्प यांची भूमिका स्पष्ट आहे. इराणमधून समृद्ध आण्विक सामग्री हटविणे आणि इराण अण्वस्त्रे तयार करीत नसल्याची खात्री करण्यासाठी पडताळणीची व्यवस्था तयार करणे आवश्यक आहे. अमेरिकेच्या या दृष्टिकोनाला इराणनेही सकारात्मक प्रतिसाद दिला. पण, चर्चा फार पुढे होऊ शकली नाही.

दरम्यान, अमेरिकेने केलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नाकेबंदीमुळे केवळ तणावात भर पडणार आहे. अमेरिकेचे कृत्य धोकादायक आणि बेजबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया चीनने दिली. इराणच्या तेलाचा मुख्य ग्राहक चीन आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीतून तीन टँकर मार्गस्थ

अमेरिकेने घोषित केलेली होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी सोमवारपासून लागू झाली. मात्र, या नाकेबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरू केली नसल्याचे चित्र आहे. या सामुद्रधुनीतून इराणशी संबंधित तीन टँकर मंगळवारी जाताना दिसल्याची नोंद झाली. मात्र, हे टँकर इराणच्या बंदरातून निघालेले किंवा बंदराकडे चाललेले नव्हते.

‘लेबनॉन-इस्रायलमधील चर्चेतील निष्कर्ष बांधील नाहीत’

लेबनॉन इस्रायलमधील थेट चर्चेतून जे निष्कर्ष निघतील, त्यांचे पालन करण्यास हेजबोला गट तयार नाही, अशी प्रतिक्रिया या गटाने दिली आहे. लेबनॉन-इस्रायलमधील चर्चेला अमेरिकेत सुरुवात होणार आहे. इस्रायलचे युद्धविरामाचे उद्दिष्ट नसून, हेजबोलाचे निःशस्त्रीकरण लेबनॉन-इस्रायलमध्ये शांतता करार आम्हाला करायचा आहे, असे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

ब्रिटन-फ्रान्समध्ये शुक्रवारी चर्चा

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ दूरभाष प्रणालीवरून शुक्रवारी विविध देशांशी संवाद साधणार आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मुक्त व्यापार अबाधित राहावा, यासाठी बहुराष्ट्रीय बचावात्मक मोहिमेमध्ये योगदान देण्यास इच्छुक असलेले देश चर्चेत सहभागी होतील.