America Iran War latest updates: पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला असून अमेरिका आणि इराण पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणवर मोठा लष्करी हल्ला केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट घोषणा केली आहे की, इराणसोबतचा तात्पुरता ‘युद्धबंदी करार’ आता अधिकृतपणे संपला आहे. मात्र, चर्चा सुरू ठेवण्यास त्यांनी संमती दिली आहे.
अमेरिकेचे इराणवर ८० हून अधिक ठिकाणांवर हल्ले!
अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन हवाई दलाने इराणमधील तब्बल ८० हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केले. हॉरमुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांवर इराणने केलेल्या हल्ल्याला हे चोख आणि तातडीचे प्रत्युत्तर असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिकेने इराणच्या खालील यंत्रणा उद्ध्वस्त केल्या
- इराणची हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार केंद्रे.
- इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स’च्या ६० हून अधिक लढाऊ नौका.
- क्षेपणास्त्र डागण्याची केंद्रे आणि लष्करी नियंत्रण कक्ष.
या लष्करी कारवाईसोबतच अमेरिकेने इराणची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने इराणला तेल विक्रीसाठी दिलेला विशेष परवाना तडकाफडकी रद्द केला आहे, ज्यामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
इराणचेही अमेरिकेला प्रत्युत्तर; बहरीन, कुवेतमधील तळांवर डागली क्षेपणास्त्रे
अमेरिकेच्या या भीषण हल्ल्यानंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी बहरीन आणि कुवेतमधील अमेरिकेच्या ८५ लष्करी तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा संयुक्त मारा केला.
इराणने बहरीनमधील अमेरिकेचा पाचवा नौदल विभाग आणि कुवेतमधील ‘अली अल सालेम’ या हवाई तळावर थेट हल्ला केल्याचा दावा केला आहे. इतकेच नाही तर, या कारवाईत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करणारे अमेरिकेचे हायटेक ‘MQ9 ड्रोन’ देखील पाडल्याचा दावा इराणने केला आहे.
“अमेरिकेला चोख उत्तर देणार”
इराणच्या सर्वोच्च लष्करी कमांडने (‘खाताम अल-अंबिया’ सेंट्रल हेडक्वार्टर्स) अमेरिकेची ही कारवाई म्हणजे उघड आक्रमकता असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेला या हल्ल्याचे ‘धक्कादायक आणि सडेतोड उत्तर’ दिले जाईल, असा इशारा इराणने दिला आहे.
ट्रम्प काय म्हणाले?
तुर्कीच्या अंकारा येथे आयोजित नाटो परिषदेत बोलताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “माझ्या मते आता युद्धबंदी संपली आहे. इराणसोबत वेळ घालवणे म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय आहे. आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करू शकतात, परंतु त्याचा काही उपयोग होईल असे मला वाटत नाही.”
याआधी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव काहीसा निवळेल अशी चिन्हे होती, मात्र नव्या संघर्षामुळे या संपूर्ण क्षेत्रातील शांतता धोक्यात आली आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयानेही यावर चिंता व्यक्त केली असून दोन्ही देशांना पुन्हा युद्ध न पेटवण्याचे आवाहन केले आहे.
