Cancer Medicine Cisplatin and Carboplatin Shortage in India: अमेरिका व इराण यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून चालू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल, डिझेल अशा इंधनाच्या पर्यायांचा तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. घरगुती सिलिंडरदेखील जपून वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण युद्धाचा फटका फक्त इंधनापुरताच मर्यादित राहिला नसून धोकादायक अशा कर्करोग अर्थात कॅन्सरच्या उपचारांवरदेखील आता युद्धाचे विपरीत परिणाम होऊ लागले आहेत. कारण भारतात कॅन्सरवरील उपचारांसाठी महत्त्वाच्या व सार्वत्रिक स्वरुपात वापर होणाऱ्या Cisplatin आणि Carboplatin या औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यासंदर्भात देशभरातील विविध रुग्णालयांतील डॉक्टर व औषध विक्रेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या सविस्तर वृत्तानुसार सिसप्लॅटिन व कार्बोप्लॅटिन या दोन औषधांचा गेल्या दोन आठवड्यांपासून तुटवडा निर्माण झाला आहे. औषध विक्रेत्यांकडे या औषधांची टंचाई निर्माण झाली असून यासंदर्भात सार्वत्रिक चिंता व्यक्त केली जात आहे. यासाठी एकीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील संवेदनशील परिस्थिती कारणीभूत असताना दुसरीकडे औषधाच्या किमती वाढवण्यावर असणारे निर्बंधदेखील परिस्थिती अधिक गंभीर बनवत असल्याचा दावा रुग्णालये व औषध विक्रेत्यांकडून केला जात आहे.

रुग्णांची Cisplatin आणि Carboplatin साठी धावाधाव!

या औषधांच्या तुटवड्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याची प्रतिक्रिया सर गंगाराम रुग्णालयाच्या मेडिकल ऑंकोलॉजीचे प्रमुख डॉ. श्याम अगरवाल यांनी दिली आहे. “आमच्या रुग्णालयातील मेडिकलमध्येच Cisplatin आणि Carboplatin चा साठा संपुष्टात येऊ लागला आहे. इथल्या प्रत्येक १० पैकी जवळपास ७ रुग्णांना या औषधांची गरज असते. यामध्ये तोंडाचा, फुफ्फुसांचा, स्तनांचा, अंडाशयाचा, अन्ननलिकेचा किंवा मानेशी निगडित कर्करोग झाल्याचं निदान झालं आहे. पण आता आमच्याकडील कर्करोग रुग्णांना या दोन औषधांसाठी सर्व मेडिकल स्टोअर्स पालथे घालावे लागत आहेत. माझ्या इतर शहरातील सहकारी डॉक्टरांनादेखील हीच परिस्थिती पाहावी लागत आहे”, असं ते म्हणाले.

नवी दिल्लीतील एम्समधले ऑंकोलॉजिस्ट डॉ. अभिषेक शंकर यांनीदेखील अशीच स्थिती सांगितली आहे. “किमान दोन आठवड्यांपासून या औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे”, असं ते म्हणाले.

मुंबईत कर्करोग औषधांची काय स्थिती?

दरम्यान, राजधानी दिल्लीत डॉक्टरांकडून तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केली जात असताना नवी मुंबईतदेखील हीच परिस्थिती असल्याचं चित्र आहे. मुंबईच्या लिलावती रुग्णालयातले ऑंकोलॉजिस्ट डॉ. मोहन मेनन यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये प्लॅटिनमचादेखील उल्लेख केला. “कर्करोगासाठी आवश्यक असणाऱ्या प्लॅटिनम आधारित औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. जागतिक स्तरावर प्लॅटिनमचे वाढलेले दर हेदेखील यासाठी कारणीभूत ठरले आहेत. २०२३ च्या सुमारास प्लॅटिनमचे दर हे २७०० रुपये प्रतिग्रॅम होते पण आता ते थेट ७८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत”, अशा शब्दांत त्यांनी चिंता व्यक्त केली.

पुरवठादारांचं औषध तुटवड्यावर काय म्हणणं आहे?

औषध विक्रेत्यांकडे असणारी टंचाई औषध पुरवठादारांकडेही दिसू लागली आहे. दिल्लीतील एका मोठ्या औषध विक्रेत्याने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या प्रतिक्रियेनुसार देशात जवळपास कुठल्याच मेडिकल स्टोअरमध्ये सध्या Cisplatin आणि Carboplatin ही औषधं उपलब्ध नाहीत. “बहुतांश होलसेल विक्रेते आणि पुरवठादारांकडील या औषधांचा साठा जवळपास संपला आहे. आता त्यांच्याकडे जी काही औषधं शिल्लक आहेत, ती मेडिकल स्टोअर्सऐवजी थेट रुग्णांना विकण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे”, असं या औषध विक्रेत्याने सांगितलं.

cancer-medicine-shortage-in-india-cisplatin-carboplatin-chemotherapy
सिसप्लॅटिन कार्बोप्लॅटिन औषध टंचाई (प्रातिनिधिक छायाचित्र – पिक्साबे)

Platinum चा तुटवडाही कारणीभूत?

अमेरिका-इराण युद्ध व त्यामुळे होर्मुझच्या आखातात निर्माण झालेली परिस्थिती, आखाती देशांमध्ये झालेले हल्ले या पार्श्वभूमीवर प्लॅटिनमचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाला. अपुऱ्या पुरवठ्यामुळे उपलब्ध प्लॅटिनमचे दरदेखील वाढले. याशिवाय, ऑटोमोबाईल क्षेत्रात, तसेच ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी प्लॅटिनमचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यात युद्धामुळे भरच पडली आहे. “भारतात बहुतांश प्लॅटिनम हे आखाती देशांमधून आयात होतं. याच देशांना युद्धाचा मोठा फटका बसला आहे”, अशी प्रतिक्रिया नाव न सांगण्याच्या अटीवर या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीने इंडियन एक्स्प्रेसला दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, संयुक्त अरब अमिरातमधून भारतात सर्वाधिक प्लॅटिनम आयात होत असून त्याचं प्रमाण जवळपास एकूण प्लॅटिनम आयातीच्या ५० टक्के इतकं आहे.