इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केलं आहे. राहुल गांधी हे उच्चशिक्षित असून त्यांना प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान आहे. ते पप्पू नाही, तर रणनीतीकार आहेत, असे ते म्हणाले अमेरिकतेल्या टेक्ससमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केलं. राहुल गांधी यांच्यासमोर केलेल्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

राहुल गांधी तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर

खरं तर काँग्रेस नेते राहुल गांधी हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते पद स्वीकारल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. यादरम्यान ते अनेकांच्या भेटी घेत आहेत. अशात ते रविवारी प्रवाशी भारतीयांच्या एका कार्यक्रमातही सहभागी झाले. यावेळी त्यांच्याबरोबर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदाही होते. या कार्यक्रमात बोलताना सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींचं पुन्हा कौतुक केलं.

हेही वाचा – सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?

नेमकं काय म्हणाले सॅम पित्रोदा?

“राहुल गांधींचा अजेंडा हा, काही मोठ्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना संबोधित करणं हा आहे. भाजपा करोडो रुपये खर्च करून ज्याप्रकारे प्रचार करते, त्यापेक्षा वेगळा दृष्टीकोन त्यांच्याकडे आहे. राहुल गांधी हे पप्पू नाहीत, तर ते उच्चशिक्षित आहेत. ते प्रत्येक विषयावर सखोल विचार करतात. ते एक रणनीतिकार आहेत”, असं सॅम पित्रोदा म्हणाले. पुढे बोलताना, “भाजपात मागच्या १० वर्षांपासून त्यांच्या विरोधात प्रचार करत आहे. मात्र, मला राहुल गांधी यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. देशाला जुमल्यांची नाही, आधुनिक विचारांच्या नेत्यांची गरज आहे”, अशी प्रतिक्रियाही पित्रोदा यांनी दिली.

हेही वाचा – Rocky Mittal : “नफरत फैलाई हमने, मुझे माफ करना राहुल मेरे भाई”, गायक रॉकी मित्तल यांचा भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश

काही दिवसांपूर्वीही केलं होतं राहुल गांधींचे कौतुक

दरम्यान, काही दिवसांपूर्वीही सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींचं कौतुक केलं होतं. “मी राजीव गांधी, पीव्ही नरसिंह राव, मनमोहन सिंग, व्हीपी सिंह, चंद्रशेखर आणि एचडी देवेगौडा यांसारख्या अनेक पंतप्रधानांसोबत काम केले आहे. मला अनेक माजी पंतप्रधानांना जवळून पाहण्याची संधी मिळाली आहे. पण कदाचित राहुल आणि राजीव यांच्यातील फरक हा आहे की, राहुल हे राजीव गांधींपेक्षा अधिक हुशार आहेत. त्यांना लोकांची काळजी आहे”, असे ते म्हणाले होते.