वृत्तसंस्था, कीव्ह
अमेरिकेन युक्रेनला केला जाणारा काही शस्त्रपुरवठा थांबवत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. रशियाबरोबरचे युद्ध अजूनही सुरू असताना अमेरिकेने हा निर्णय घेतल्यानंतर युक्रेन आपल्या काही मित्र देशांबरोबर संयुक्तरित्या शस्त्र उत्पादन करण्याची योजना आखत आहे. दरम्यान बुधवारीही रशियाने युक्रेनच्या भूभागावर आणखी जोमाने आक्रमण केले. तसेच क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ल्यांची तीव्रताही वाढवली.
अमेरिकेने शस्त्रपुरवठा थांबवल्यामुळे युरोपीय देशांवरील जबाबदारी वाढल्याचे मानले जात आहे. युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांबरोबर आगामी बैठकीसाठी आमचे अधिकारी तातडीने तयारी करत आहेत असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सांगितले. शस्त्र उत्पादनासाठी युरोपीय महासंघ आणि अन्य युरोपीय देशांकडून सहकार्य मागितले जाईल असे त्यांनी सांगितले.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल माक्राँ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यादरम्यान मंगळवारी जवळपास तीन वर्षांनंतर पहिल्यांदा दूरध्वनीवरून संभाषण झाले. या दोन तासांच्या संभाषणादरम्यान माक्राँ यांनी युक्रेनची स्वायत्तता आणि प्रादेशिक अखंडतेला अविचल पाठिंबा देण्याचे स्पष्ट केले तसेच युद्धविरामाचे आवाहनही केले. यादरम्यान, अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविरामाचे राजनैतिक प्रयत्न थांबवण्यात आले आहेत.
निर्णयाचे कारण
अमेरिकेचा स्वत:चा शस्त्रसाठा झपाट्याने कमी होत असल्यामुळे युक्रेनला काही शस्त्रांचे वितरण थांबवले आहे असे संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले. यापैकी काही शस्त्रांचा दीर्घकाळ पुरवठा करण्याचे आश्वासन जो बायडेन यांच्या प्रशासनाने केले होते. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे युद्ध लवकर संपण्यात मदत होईल असे मत क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी व्यक्त केले.