अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर सामान्य अमेरिकन नागरिकाला कोणते फायदे होणार आहेत, त्याबद्दल एका मुलाखतीत माहिती दिली आहे. निकोलस मादुरो यांना अटक केल्याने अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या नैसर्गिक संसाधनांवर थेट नियंत्रण मिळाल्याचे व्हान्स म्हणाले. तसेच त्यांनी अमेरिकन नागरिकांना आता चांगल्या दर्जाची ऊर्जा अत्यंत स्वस्तात मिळेल, असे आश्वासन दिले आहे. अमेरिकन सैनिकांनी यशस्वी केलेल्या मोहिमेमुळे यापुढे अमेरिकेच्या विरोधात जाण्याची हिंमत कोणी करणार नाही, असा इशारादेखील व्हान्स यांनी दिला. अमेरिकेचे उपाध्यक्ष काय म्हणाले ते जाणून घेऊ.

व्हेनेझुएलातील नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण

अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी.व्हान्स यांनी ‘फॉक्स न्यूज’ला मुलाखत दिली. व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना अटक केल्याने सामान्य अमेरिकन नागरिकांना काय फायदा होईल, याचा पाढा व्हान्स यांनी वाचून दाखवला. ते म्हणाले, सगळ्यात आधी तर आपल्याला व्हेनेझुएलातील नैसर्गिक संसाधनांचा वापर करता येईल. हे अमेरिकेसाठी चांगले आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांना निश्चितच काही फायदे होतील.

सामान्य नागरिकांना दर्जेदार ऊर्जा मिळणार

अमेरिकन नागरिकांना गरज असलेली चांगल्या दर्जाची ऊर्जा यापुढे अगदी कमी किंमतीत मिळेल, असे जे. डी. व्हान्स म्हणाले. त्यांनी अमेरिकन सैन्याने केलेल्या कारवाईवर देखील भाष्य केले. अमेरिकन सैनिकांनी निकोलस मादुरो यांना ज्याप्रकारे अटक केली, त्यानंतर अमेरिकेविरोधात जाण्याची भविष्यात कोणीही हिंमत करणार नाही, असा इशारा व्हान्स यांनी दिला. ते म्हणाले, “शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्हाला संधी मिळाली की तुम्ही किती जोरात प्रहार करू शकता हे दाखवून देणे महत्वाचे असते. मला वाटतं याचा देखील फायदा अमेरिकन नागरिकांना होईल.”

“शेजारील देशांवर अमेरिकेचे २०० वर्षांपासून नियंत्रण”

अमेरिकेने शेजारील देशांवर मागील २०० वर्षांपासून नियंत्रण ठेवले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वात अमेरिका यापुढेही शेजारील देशांवर नियंत्रण ठेवेल, असे व्हान्स म्हणाले. “अमेरिकेने शेजारील देशांवर २०० वर्ष नियंत्रण ठेवले होते. ते अमेरिकेचे धोरण आहे. पण काही वाईट लोकांनी त्याचा फायदा घेतला.” दरम्यान, व्हेनेझुएलामध्ये कच्च्या तेलाचे साठे तसेच सोन्याच्या खाणी मोठ्या प्रमाणात आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी तेल कंपन्यांना व्हेनेझुएलामध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर अमेरिकेने नार्को-दहशतवाद, ड्रग्ज तस्करी, कोकेन तस्करीचे आरोप केले आहेत. त्यांच्यावर अमेरिकन न्यायालयात खटला सुरू आहे.