American citizen Jordan Brown arrested: भारत – नेपाळ सीमेवरुन नेपाळमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना एका अमेरिकेच्या नागरिकाला अटक करण्यात आली आहे. सशस्त्र सीमा दलाच्या जवानांनी या नागरिकाला अटक केली असून, त्याची चौकशी केली जात आहे. वैध कागदपत्रांशिवाय सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करताना करताना त्याला अटक करण्यात आली असून, सुरक्षा यंत्रणांकडून अमेरिकी नागरिकाची चौकशी केली जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या नागरिकाशी निगडीत कोणत्याही संशयास्पद हालचालीचा पुरावा आढळून आलेला नाही.
अटक व्यक्तीची चौकशी सुरु
अटक करण्यात आलेल्या या अमेरिकी नागरिकाने केलेल्या दाव्यांची पडताळणी तपास यंत्रणा करत आहेत. “या व्यक्तीची मूळ ओळख, प्रवासाचा इतिहास, यापूर्वी भेट दिलेल्या देशांची यादी आणि त्याचे भारतात येण्याचे कारण, याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे”, अशी माहिती पोलिसांनी हिंदुस्तान टाईम्सला दिली आहे.
अटक करण्यात आलेला व्यक्ती कोण आहे?
जॉर्डन ब्राऊन असे या ३६ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. कॅलिफोर्निया, अमेरिका येथील तो रहिवासी असल्याचा दावा करत आहे. जॉर्डनची चौकशी केली त्यावेळी त्याने पर्यटक व्हिसावर थायलंडला भेट दिल्याचे सांगितले. सागरी मार्गाने तो पहिल्यांदा श्रीलंकेत आला आणि त्यानंतर नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याने सागरी मार्गेच भारतात प्रवेश केला. वैध कागदपत्रांशिवाय नेपाळमध्ये प्रवेश करताना सशस्त्र सीमा दलाच्या जवानांनी अटक केल्याची माहिती महाराजगंजचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक सिद्धार्थ यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिली.
गोव्यात वास्तव्य
“११ जुलै रोजी नेपाळमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना त्याला अटक करण्यात आली. चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जॉर्डन ब्राऊन असे असल्याचे सांगत तो कॅलिफोर्नियाचा रहिवासी असल्याचे सांगितले”, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. “काहीकाळ हा व्यक्ती गोव्यात देखील राहत होता. त्याच्याकडे कोणत्याही प्रकारची वैध कागदपत्रं नाहीत. त्याने केलेल्या दाव्यांची सध्या चौकशी केली जात आहे”, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
रोख रक्कम आणि फोन जप्त
नेपाळमध्ये सीमेवरुन जाण्याच्या उद्देशानेच जॉर्डन बंगळुरु येथून सोनाउली पर्यंत प्रवास केला होता. सुरक्षा दलाच्या जवानांनी थांबविण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता दरम्यान, त्याला अखेर अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३१,४६० रोख आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
