American Couple India Trip news : बजेटमध्ये विदेशी दौऱ्यांसाठी भारत देश विदेशी पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्येही वाढ झाली आहे. कमी खर्चात सुंदर देश पाहण्याचं सुख विदेशी पर्यटकांना मिळतं. पण अमेरिकेतील एका जोडप्याने मात्र धक्कादायक माहिती दिली आहे. १ महिना भारतात फिरण्याकरता त्यांना तब्बल लाखो रुपयांचा खर्च आलाय. या एका महिन्यात ते जवळपास १३ शहरांमध्ये फिरले आहेत.
१३ भारतीय शहरांमध्ये ३० दिवसांच्या प्रवासादरम्यान तब्बल १०,६०५ डॉलर्स (सुमारे १० लाख रुपये) खर्च केल्याचा खुलासा एका अमेरिकन दाम्पत्याने केला आहे. त्यांचा हा दावा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. अॅलेक्स आणि अमेलिया या प्रवासी जोडप्याने त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा खर्च शेअर करताना मान्य केले की, हा एकूण खर्च त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त होता.
३० दिवसांत १३ शहरांना भेट
बजेट ट्रॅव्हलऐवजी (स्वस्त पर्याय) आलिशान राहणीमान आणि प्रीमियम अनुभवांना पसंती दिल्यामुळे हा खर्च वाढल्याचे त्यांनी सांगितले. “आम्ही आमच्या ३० दिवसांच्या भारत दौऱ्यात एकूण १०,६०५ डॉलर्स (१० लाख रुपये) खर्च केले. म्हणजेच दररोज ३५४ डॉलर्स (सुमारे ३३,६२७ रुपये) खर्च झाले”, असे या दाम्पत्याने लिहिले. तसेच या प्रवासात वाहतुकीवर सर्वाधिक खर्च झाल्याचे त्यांनी नमूद केले. “आम्ही अवघ्या ३० दिवसांत १३ शहरांना भेट दिली, ज्याचा अर्थ असा की आम्हाला प्रवासात खूप वेळ घालवावा लागला आणि शेवटी हा आमच्या सर्वात मोठ्या खर्चांपैकी एक ठरला.”
खर्च कुठे आणि कसा वाढला?
या जोडप्याने सांगितले की, त्यांनी आपल्या भारत प्रवासादरम्यान ६ विमाने, ६ खाजगी गाड्या आणि २ वेळा ट्रेनने प्रवास केला. प्रीमियम हॉटेल्सच्या महागड्या दरांमुळे हा खर्च आणखी वाढला. कारण एका रात्रीचे भाडे साधारणपणे १२७ डॉलर्स (सुमारे १२,०६४ रुपये) होते. “जर तुम्ही फक्त बजेट पर्यायांचा विचार करत नसाल, तर इतर प्रवासी सांगतात तितके राहणे स्वस्त नाही”, असे सांगत त्यांनी सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण बाहेर केल्यामुळे खिशाला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट केले.
“जेव्हा आम्ही संपूर्ण हिशोब केला आणि एका महिन्यात भारतात नेमका किती खर्च झाला हे पाहिले, तेव्हा आम्हाला स्वतःलाही आश्चर्य वाटले, हे सांगायला आम्हाला संकोच वाटत नाही.” पोस्ट व्हायरल झाल्यानंतर काही सोशल मीडिया युजर्स इतका मोठा खर्च पाहून थक्क झाले, तर काहींनी सांगितले की, हे दाम्पत्य राजा-राणीसारखे राहिल्यामुळे एवढा खर्च होणे स्वाभाविक आहे. एका युझरने कमेंट केली, “वाव, जर तुम्ही एका महिन्यात इतका खर्च केला असेल, तर तुम्ही नक्कीच राजा-राणीसारखे आयुष्य जगलात.” दुसऱ्या एका युझरने लिहिले, “जे लोक आश्चर्यचकित होत आहेत, त्यांनी बहुधा तुमच्या प्रोफाइलवरील पहिली पिन केलेली पोस्ट वाचलेली नाही. तुम्ही वर्षभर फिरण्यासाठी निघण्यापूर्वी १ लाख डॉलर्सची बचत केली होती, हे त्यात स्पष्ट लिहिले आहे. त्यामुळे तुम्ही पैशांची बचत करण्यासाठी किंवा कठीण परिस्थितीत प्रवास करण्यासाठी आलेला नाहीत.”
तिसऱ्या युझरने म्हटले, “हे पटण्यासारखे आहे. जर तुम्ही बॅकपॅकरसारखे फिरलात आणि स्थानिक जेवण खाल्ले, तर भारत खूप स्वस्त ठरू शकतो. परंतु मध्यम ते उच्च दर्जाची हॉटेल्स, चांगल्या गुणवत्तेचे जेवण आणि विशेष अनुभवांसाठी खर्च वाढतोच. विशेषतः करोना महामारीनंतर भारतात किमती खूप वाढल्या आहेत.” तर चौथ्या युझरने लिहिले, “बापरे! मी भारतात दोन महिने घालवले होते, पहिल्या महिन्यात ५०० डॉलर्स आणि दुसऱ्या महिन्यात ७०० डॉलर्स खर्च झाले होते. तुमचा खर्च खरोखरच खूप जास्त आहे.”
