Indians caught driving trucks illegally in US : अमेरिकेतील भारतीय ट्रक चालकांवर ट्रम्प प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहून व्यावसायिक ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या सुमारे ३० भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांना मायदेशात पाठवले जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही कारवाई ११ ते १५ मे दरम्यान राबवलेल्या ‘ऑपरेशन चेकमेट’चा भाग होती. ॲरिझोनामधील युमा सेक्टरमध्ये अमेरिकन बॉर्डर पेट्रोल एजंट्सनी ही मोहिम राबवली होती. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

एका निवेदनानुसार, या मोहिमेदरम्यान ५२ विनादस्तऐवज (अवैध) व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले, ज्यामध्ये सेमी-ट्रक चालवणाऱ्या ३६ जणांचा समावेश आहे. या ३६ चालकांपैकी ३० जण भारतातील होते, तर इतर मेक्सिको, एल साल्वाडोर आणि रशियाचे होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काहींकडे कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन आणि व्हर्जिनियासारख्या राज्यांनी जारी केलेले व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स (CDL) होते, तर इतरांकडे वैध लायसन्स नव्हते.

अटक करण्यात आलेल्यांपैकी बहुतांश लोकांकडे मागील प्रशासनाच्या काळात जारी करण्यात आलेले रोजगार अधिकार दस्तऐवज (Employment Authorisation Documents) होते, परंतु ते आता वैध नव्हते. या सर्व व्यक्तींवर फेडरल कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून त्यांना मायदेशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चालकांना का ताब्यात घेण्यात आले?

कार्यवाहक मुख्य पेट्रोल एजंट डस्टिन कॉडल म्हणाले, सार्वजनिक सुरक्षेला मोठा धोका निर्माण करणाऱ्या आणि बेकायदा चालकांपासून समूदाय आणि रस्त्यांचं रक्षण करण्यासाठी ऑपरेशन चेकमेट मोहीम राबवली जाते. अपात्र चालकांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासन काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेचा मुख्य उद्देश इमिग्रेशन (स्थलांतरण) कायद्यांची अंमलबजावणी करणे आणि देशात कायदेशीर दर्जा नसताना व्यावसायिक वाहने चालवणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवणे हा आहे. अलीकडच्या महिन्यांत, अमेरिकेत भारतीय वंशाच्या चालकांचा गंभीर रस्ते अपघातांशी संबंध असल्याचे काही गुन्हे समोर आले आहे. परिणामी प्रशासनाने त्यांच्यावरील देखरेख आणि तपास अधिक तीव्र केला आहे.