scorecardresearch

रशियात अमेरिकी पत्रकाराला हेरगिरीच्या आरोपावरून अटक

रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सव्‍‌र्हिस (एफसबी) या सुरक्षाविषयक संस्थेने प्रतिष्ठित वॉल स्ट्रीट जर्नलच्या अमेरिकी पत्रकाराला हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली.

russia america
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मॉस्को : रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सव्‍‌र्हिस (एफसबी) या सुरक्षाविषयक संस्थेने प्रतिष्ठित वॉल स्ट्रीट जर्नलच्या अमेरिकी पत्रकाराला हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली. शीतकाळानंतर पहिल्यांदाच रशियाने अमेरिकेच्या पत्रकारावर कारवाई केली आहे. रशिया-युक्रेन युद्धावरून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले असताना रशियाने हे कठोर पाऊल उचलले आहे.

रशियामधील युरल माउंटन्सजवळील येकातेरिनबर्ग या शहरामधून पत्रकार इव्हान गश्र्कोविच गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना अटक केल्याची माहिती एफसबीने गुरुवारी दिली. मात्र ही अटक कधी झाली हे सांगण्यात आले नाही. गश्र्कोविच अमेरिकेच्या आदेशावरून रशियाची राष्ट्रीय गुपिते असलेल्या लष्करी औद्योगिक संकुलामधील एका उपक्रमाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप एफएसबीने केला आहे. त्यांच्यावरील हेरगिरीचे आरोप सिद्ध झाले तर त्यांना २० वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ते वॉल स्ट्रीट जर्नलच्या मॉस्को कार्यालयात रशिया, युक्रेन आणि सोव्हिएत रशियातून बाहेर पडलेल्या देशांचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. दुसरीकडे गश्र्कोविच यांच्या सुरक्षेबद्दल चिंता वाटत असल्याची प्रतिक्रिया वॉल स्ट्रीट जर्नलकडून देण्यात आली. गश्र्कोविच यांना पत्रकार म्हणून काम करण्यासाठी रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून मान्यता मिळाली होती. मात्र ते पत्रकार म्हणून मिळालेल्या सुविधांचा वापर करून पत्रकारितेशी संबंध नसलेली कामे करत होते, असा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला.

.. शेवटची अटक ३७ वर्षांपूर्वी

यापूर्वी सप्टेंबर १९८६ मध्ये, म्हणजे शीतयुद्ध सुरू असताना, केजीबी या रशियन गुप्तहेर संघटनेने यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टच्या निकोलस डॅनिलॉफ या मॉस्को प्रतिनिधीला रशियाने हेरगिरीच्या आरोपावरून अटक केली होती. ते २० दिवस केजीबीच्या ताब्यात होते. एफबीआयने अटक केलेल्या सोव्हिएत रशियाच्या एका कर्मचाऱ्याची सुटका करण्याच्या बदल्यात डॅनिलॉफ यांची सुटका करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 00:02 IST

संबंधित बातम्या