पीटीआय, नवी दिल्ली
इराणची नाविक कोंडी करण्याच्या हेतूने अमेरिकेच्या नौदलाने गेले काही दिवस केलेल्या बेजबाबदार अग्निवर्षावात एका व्यापारी जहाजावरील तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असून, युद्धग्रस्त पश्चिम आशियात भारतीय नागरिकांचे रक्षण करण्याविषयी सरकार पुरेसे गंभीर नसल्याची टीका विरोधी पक्षांनी केली.
संबंधित तीन खलाशी बेपत्ता झाल्याचे वृत्त बुधवारी रात्री धडकले, तेव्हा भारताने अमेरिकेच्या मुत्सद्द्यांना पाचारण करून निषेध व्यक्त केला. तिन्ही खलाशी मृत झाल्याचे केंद्रीय जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी गुरुवारी जाहीर केले. विशाखापट्टणम येथील सुरेश पटनाला (वय ४४), हिमाचल प्रदेशातील आदित्य शर्मा (वय २३), उत्तर प्रदेशातील शिवानंद चौरसिया अशी मृतांची नावे आहेत.
मृत खलाशांच्या कुटुंबीयांप्रति आम्ही सहवेदना व्यक्त करीत आहोत असे म्हणत काँग्रेसने या प्रकरणी सरकारवर टीका केली. ‘‘मालवाहतूक धोक्यात टाकणार्या अमेरिकेच्या या हल्ल्यांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर वैयक्तिक संबंध उत्तम असल्याचे वारंवार म्हटले आहे. त्यांचे हे उत्तम संबंध भारतीयांचे जीव वाचविण्यामध्ये उपयोगी ठरलेले नाहीत. ते या जबाबदारीपासून पळ काढू शकणार नाहीत. सरकारने आवश्यक ती सर्व पावले उचलून जबाबदारी निश्चित करावी,’’ असे काँग्रेसच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने नमूद केले.
याबरोबरच डाव्या पक्षांनीही या घटनेचा निषेध केला. अमेरिकेने होर्मुझ सामुद्रधुनीत भांडवलशाहीचे ओंगळवाणे प्रदर्शन मांडले आहे. व्यावसायिक तेलवाहू जहाजावर हल्ल्यांचे समर्थन करताच येत नाही. आणि तरीही आपल्या परराष्ट्र खात्याने निवेदनात अमेरिकेचा साधा उल्लेखही केलेला नाही. मोदी निव्वळ ट्रम्प यांचे अभिनंदन करण्यातच व्यग्र असतात, असे डाव्या पक्षांनी म्हटले आहे.
केंद्राकडून अमेरिकेकडे नाराजी व्यक्त
अमेरिकी लष्कराच्या हल्ल्यात तीन भारतीयांचा मृत्यू झाल्याने केंद्र सरकारने अमेरिकेकडे नाराजी व्यक्त केली. हा मुद्दा अमेरिकेकडे गांभीर्याने उपस्थित करण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी सांगितले. अमेरिककडून जहाजांवरील हल्ले त्वरित थांबले पाहिजे, असे जैस्वाल म्हणाले. नौकांवरील अमेरिकी हल्ल्याबाबत भारताने गुरुवारी प्रथमच जाहीर निवेदन सादर केले. या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेचे भारतातील राजनैतिक अधिकारी जेसन मीक्स यांना समन्स बजावले आणि त्यांच्याकडे तीव्र निषेध व्यक्त केला. अमेरिकेने पहिल्या दोन हल्ल्यांची पुष्टी दिली असून, ‘जलवीर’वरील हल्ल्यावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘जलवीर’ नौकेवरील प्रवाशांची सुटका
बंदरे, जहाजबांधणी, जलमार्ग मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मुकेश मंगल यांनी सांगितले, की ‘जलवीर’ नौकेवरील खलाशांची सुटका करण्यात येत आहे. ‘सेतेबेलो’वरील उर्वरित सर्व २५ खलाशांची सुटका करण्यात आली आहे. त्यामध्ये २१ भारतीय होते. याखेरीज, दोन पाकिस्तानी, एक रशियन आणि एक युक्रेनचा खलाशी होता. मृत तीन भारतीय खलाशांच्या कुटुंबांना १० लाख रुपये देण्याची मागणी आम्ही ‘खलाशी कल्याणकारी निधी सोसायटी’कडे केली आहे. आखाती भागांत १८ हजारांहून अधिक भारतीय खलाशी आहेत. त्यातील ५६२ खलाशी भारताच्या १३ नौकांवर आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेकडे ३२९ नौका, तर ओमानच्या आखातात २३३ नौका आहेत.
‘हल्ले अस्वीकारार्ह’
अमेरिकेने आतापर्यंत नौदल नाकेबंदी तोडणार्या आठ नौकांना निकामी केले असून, १३४ नौकांना दुसर्या मार्गे वळविले आहे. मानवी मदत घेऊन जाणार्या ४२ नौकांना सामुद्रधुनीतून जाऊ देण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेचे सरचिटणीस आर्सिनियो डोमिंग्वेझ यांनीही असे हल्ले स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे.
भारत-अमेरिकेत आरोप-प्रत्यारोप
- होर्मुझ सामुद्रधुनी भागात अमेरिकेने हल्ले न करण्याची भारताची मागणी
- नौदल नाकेबंदीचे उल्लंघन केल्यामुळे हल्ले केल्याचे अमेरिकेचे म्हणणे
- सेतेबेलो या तेलाच्या टँकरवर विमानाद्वारे क्षेपणास्त्र डागून इंजिन रूम असलेल्या भागात हल्ला. यात तीन भारतीयांचा मृत्यू.
- भारताचे जहाजबांधणी मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी तीन खलाशांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त.
२४ कर्मचारी आज मायदेशी परतणार?
‘एमटी मॅरिव्हेक्स’ या व्यापारी जहाजावर ८ जून रोजी झालेल्या हल्ल्यानंतर वाचवण्यात आलेल्या २४ भारतीय कर्मचार्यांना ओमानमधील भारतीय दूतावासाकडून सर्वतोपरी मदत दिली जात आहे आणि ते शुक्रवारी मायदेशी परतण्याची अपेक्षा आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव असीम आर. महाजन यांनी सांगितले. ‘सेतेबेलो’ जहाजावरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन भारतीय खलाशांचे मृतदेहन लवकरच मायदेशी आणण्यासाठी ओमानमधील भारतीय दूतावास संबंधित अधिकार्यांच्या संपर्कात आहेत.
