American tourist woman rape case Karnataka: अमेरिकेतील एका पर्यटक महिलेवर कर्नाटकमधल्या एका होमस्टे सुविधेच्या कर्मचाऱ्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्नाटकच्या कोडगू जिल्ह्यातल्या कुट्टा परिसरातील एका होमस्टेमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पीडित पर्यटक महिलेनं होमस्टेमधील कर्मचारी व मालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. गंभीर बाब म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यानं केलेला गुन्हा लपवण्यासाठी मालकानं तीन दिवस होमस्टेचं इंटरनेट बंद केलं होतं. पीडित महिलेलाही या काळात त्यानं डांबून ठेवलं होतं.
अशी निसटली पीडित पर्यटक महिला…
समोर आलेल्या माहितीनुसार, सदर महिला कर्नाटकमध्ये पर्यटनासाठी आली असता कुट्टा भागातील या होमस्टेमध्ये तीन दिवसांसाठी वास्तव्यास होती. गेल्या आठवड्यात तिथे वास्तव्य करत असताना होमस्टेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. हा सगळा प्रकार समजल्यानंतर होमस्टेच्या मालकानं तो दडवून ठेवण्यासाठी तिथलं इंटरनेट तीन दिवस बंदच ठेवलं. शिवाय, पीडित महिलेनं हा प्रकार इतर कुणाला सांगू नये, यासाठी तिला तीन दिवस होमस्टेमध्येच डांबून ठेवलं.
आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पीडित महिलेनं अखेर होमस्टेच्या मालकाला आपण मैसूरला निघून जातोय, असं खोटं सांगितलं. तिथून निसटल्यानंतर पीडित महिलेनं थेट अमेरिकी दूतावासाशी संपर्क साधला. घडलेला सर्व प्रकार तिने दूतावासात कळवला. यानंतर अमेरिकी दूतावासातील अधिकाऱ्यांनी मैसूर पोलिसांशी संपर्क साधून संबंधित प्रकरणात कारवाई करण्याची विनंती केल्यानंतर मैसूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत होमस्टेचा चालक व बलात्कार करणारा कर्मचारी या दोघांनाही अटक केली.
गुंगीचं औषध देऊन केला बलात्कार
महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार, होमस्टेमध्ये आरोपी कर्मचाऱ्यानं तिला शीतपेयातून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मैसूर पोलिसांनी आरोपींविरोधात विदेशी पर्यटक महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. कु्टा पोलीस स्थानकात यासंदर्भातली सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केलं असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पीडित अमेरिकी पर्यटक महिलेवर मैसूरमधील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
भाजपाकडून परखड शब्दांत टीका
दरम्यान, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनदेखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपाचे स्थानिक आमदार सी. टी. रवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्यातून संताप व्यक्त केला आहे. “एका विदेशी महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा हा प्रकार लाजिरवाणा आणि अस्वीकारार्ह आहे. अशा घटना भारताच्या अतिथी देवो भव: या मूल तत्वालाच हरताळ फासणाऱ्या आहेत. हा फक्त एका व्यक्तीविरोधातला गुन्हा नसून संपूर्ण देशाच्याच प्रतिमेवर लागलेला डाग आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी यासंदर्भात कठोर कारवाई करावी आणि पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा”, अशी पोस्ट रवी यांनी केली आहे.
